मोदींपेक्षा इम्रान खान देशासाठी मोठा धोका; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

Pakistan Defence Minister Khwaja M Asif

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान हे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठा धोका असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा एम आसिफ यांनी एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

‘तुमचा परदेशी शत्रू तुम्ही ओळखतात. पण अजूनही इथे (पाकिस्तानात) जन्मलेल्या शत्रूला ओळखता येत नाही. नरेंद्र मोदींपेक्षा इम्रान खान पाकिस्तानसाठी धोकादायक आहे आणि लोकांना हे दिसत नाही. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. कोण जास्त धोकादायक आहे? आपल्यापैकी कोणी की दुसऱ्या बाजूला तुमच्या समोर उभा असलेला?’, असं आसिफने विचारलं.

9 मे रोजी इम्रान खानच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानातील निदर्शने ही ‘बंडखोरी’ होती, असंही आसिफ म्हणाले.

‘हा शत्रू खरोखरच आपल्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहे आणि 9 मे हा त्याचा पुरावा आहे. ती बंडखोरी होती. तो एक विद्रोह होता’, असं ते पुढे म्हणाले.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणाच्या संदर्भात 9 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून इम्रान खानला सशस्त्र निमलष्करी दलाने अटक केल्यावर समर्थकांनी पाकिस्तानमध्ये निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी लष्कराच्या मुख्यालयावर, सर्वोच्च कमांडर्सच्या निवासस्थानांवर हल्ला केला, रस्त्यावर उतरून वाहने जाळली, राष्ट्रीय महामार्ग रोखला आणि देशाच्या सुरक्षा दलांवर हल्ला केला.