पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू कश्मिरात शिजला; पाकड्यांचा कांगावा

48

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसून हा कट जम्मू कश्मिरमध्येच शिजल्याचा कांगावा करायला पाकड्यांनी सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. पुलवामा हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. हिंदुस्थानी लष्कराने कोणतीही कारवाई केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला पूर्ण सूट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसून तो कट जम्मू कश्मीरमध्येच शिजल्याचा कांगावाही त्यांनी केला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईसाठी सुरक्षा दलाला पूर्ण सूट दिली आहे. त्यानंतर बाजवा यांनी इमरान यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर इमरान यांनीही पाकिस्तानी लष्कराला प्रत्युत्तरादाखल कारवाईचीपूर्ण सूट दिली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा समितीचीही बैठक झाली. या बैठकीत हिंदुस्तानच्या सीमाभागातील सुरक्षेच्या आढावा घेण्यात आला. या बैठकीला बाजवा गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांसह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. या बैठकीत कूलभूषण जाधव प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचाही आढावा घेण्यात आला.

पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. हिंदुस्थानला याबाबतची सूचना देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतरची देशाची भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कराने कारवाई केल्यास पाकिस्तानी लष्कराला प्रत्युत्तर देण्यासाठी सूट देण्यात आली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक पातळीवरून दाबाव वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या