खायचे वांदे, पण युद्धाची खुमखुमी कायम! PoK मधून इम्रान यांचा हिंदुस्थानला इशारा

1499

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

एकवेळचे खायचे वांदे असलेल्या पाकड्यांना पुन्हा एकदा युद्धाची खुमखुमी आली आहे. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवल्याने पाकिस्तान बिथरला असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदुस्थानला युद्धाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर कश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण देशच उभा ठाकला असल्याचा दावा खान यांनी केला आहे.

PoK मध्ये आज बुधवारी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी खान यांनी 370 कलम हटवल्यावरून हिंदुस्थानला लक्ष्य केले. 370 कलमाचा मुद्दा पाकिस्तान जगातील प्रत्येक मंचावर मांडणार असून गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणार असल्याचे इम्रान यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी आरएसएसलाही आपल्या भाषणातून लक्ष्य केले. हिंदुस्थानात जमावाकडून मुस्लीमांना ठार करण्यात येत असल्याने येथील मुस्लीम समाज दहशतीत आहे. कश्मीरमध्येही असेच तणावपूर्ण वातावरण असून कश्मीरी मुस्लीमही दहशतीत आहेत. पाकिस्तान त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.

370 कलम हटवण्याचा निर्णय हिंदुस्थानला महागात पडेल अशा पोकळ धमक्याही इम्रान यांनी दिल्या. आंतरराष्ट्रीय समुदाय हिंदुस्थानने घेतलेल्या या निर्णयाकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप करत इम्रान यांनी जगातील प्रत्येक व्यासपीठावर आम्ही हा मुद्दा लावून धरणार असल्याचा म्हटले. तसेच कश्मीरचा राजदूत बनून मीच हा प्रश्न सर्वत्र मांडणार असेही इम्रान यांनी भाषणात म्हटले आहे. त्याचबरोबर जगभरात या मुद्द्याविरोधात रॅली काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच आमचे लष्कर युद्धासाठी तयार असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या