इम्रान खान यांना माश्या-किड्यांनी छळलं; तुरुंगातून लवकर बाहेर काढण्याची वकिलांना केली विनवणी

Imran-Khan

तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या वकिलांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. तुरुंगात दिवसा माश्या आणि रात्री किड्यांचा प्रादुर्भाव असल्यानं इम्रान खान कंटाळले आहेत. त्यामुळे तुरुंगातून शक्य तितक्या लवकर बाहेर काढा, अशी विनंती त्यांनी केल्याचं वृत्त आहे.

तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले इम्रान खान, तुरुंगाच्या कोठडीत अडकून राहिल्याने नाराज आहेत. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

इस्लामाबाद ट्रायल कोर्टाने त्याना या प्रकरणात ‘भ्रष्ट व्यवहार’ केल्याबद्दल दोषी ठरवल्यानंतर शनिवारी त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

इम्रान खान यांनी इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या शिक्षेविरोधात दाद मागितली आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या अध्यक्ष असलेल्या इम्रान यांनी त्यांच्या वकिलांच्या टीमला सांगितलं आहे की त्यांना तुरुंगात आणखी काही काळ राहण्याची अजिबात इच्छित नाही. जिओ न्यूजने इम्रान खान आणि त्यांचे वकील यांच्यातील भेटीचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

खानचे वकील नईम हैदर पंजोथा यांना सोमवारी तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी प्रवेश दिला होता.