इम्रान खान यांच्या पक्षाच्या शीख नेत्याला हिंदुस्थानात हवा आश्रय

562

लोकसभा निवडणुकीवेळीनया पाकिस्तानबनवण्याची घोषणा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातेहरीकएन्साफपक्षाचे शीख नेते आणि माजी आमदार बलदेव कुमार हे हिंदुस्थानच्या आश्रयाला आले आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेले हिंदू, शीख आणि ख्रिश्चन सुरक्षित नाहीत, असा दावा करत त्यांनी मला आता हिंदुस्थानात आश्रय हवा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या एका अल्पवयीन शीख मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर तिचे धर्मांतर करून एका मुस्लिम युवकाबरोबर तिचे लग्न लावून देण्यात आले. ही घटना ताजी असतानाच आता इम्रान खान यांच्या पक्षातील नेते असलेले बलदेव कुमार यांनी पाकिस्तानात अल्पसंख्याक समाज सुरक्षित नसल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या खन्नामध्ये बलदेव राहतात. गेल्या तीन महिन्यांपासून ते हिंदुस्थानात व्हिसावर राहत आहेत. इम्रान खान यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर आता माझा विश्वास नसल्याचे ते म्हणाले.

मी परत जाणार नाही!

पाकिस्तानमध्ये फक्त अल्पसंख्याक समाजच नाही तर मुस्लिमही सुरक्षित नाहीत. अल्पसंख्याक समाजाला तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. माझी हिंदुस्थान सरकारला विनंती आहे की, त्यांनी मला आश्रय द्यावा. मी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही, असे बलदेव कुमार म्हणाले.

हिंदूशीखांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी!

हिंदू आणि शीख समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे मी भाजप सरकारला विशेष करून मोदी सरकारला विनंती करतो की, त्यांनी पाकिस्तानमधून हिंदुस्थानमध्ये येऊ इच्छिणार्‍या हिंदू आणि शीख समाजासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी. त्यामुळे या दोन्ही धर्मातील लोक हिंदुस्थानात येऊन राहू शकतील, अशी विनंतीही बलदेव यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या