अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या इम्रानला अटक

28

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पैशावरून झालेल्या भांडणामुळे महिलेचा गळा आवळून खून करणाऱ्या टेम्पोचालकास पकडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे महिलेची ओळख पटलेली नसताना केवळ तंत्रशुद्ध तपासाच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत खुनाचा गुन्हा उघड केला आहे.

नेवासा फाटा येथील संगीता शिंदे हिचे जोगेश्वरी येथील इम्रान खान इब्राहिम खान पठाण याच्यासोबत अनैतिक संबंध होते. अधूनमधून इम्रानखान संगीताच्या संपर्कात येत असे. १७ एप्रिल रोजी इम्रान खान नगरहून संभाजीनगरात येत असताना त्याला संगीता भेटली. दोघे टाटा एस वाहनातून येत असताना त्यांच्यात पैशावरून वाद झाला. रागाच्या भरात इम्रान याने संगीता हिचा गळा आवळून मृतदेह रोडच्या कडेला फेकून दिला आणि पळ काढला.

पोलिसांना रस्त्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह घाटीत पाठवून एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने मृत महिलेच्या अंगठ्याच्या ठशावरून तिचे आधार कार्ड शोधून काढले. त्यावरून ती नेवासा येथील असल्याचे उघड झाले. तिचे मोबाईल कॉल डिटेल तपासले असता तिच्या मोबाईलवर हर्सूल कारागृहात एका खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या जावेद शेख याच्या मोबाईलवरचे कॉल असल्याचे आढळून आले.

परंतु खून झाला, तेव्हा तो कारागृहात असल्याने आणि त्याचे सिम कार्ड दुसरा कुणी वापरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी अधिक शोध घेतला असता त्यांना आढळून आले की, जावेद याचा मेहुणा इम्रान हा जावेद याचे सिम कार्ड वापरतो आहे. त्यानंतर पोलिसांनी सरळ इम्रान यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने संगीता शिंदे हिचा खून केल्याची कबुली दिली.

संगीता हिचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिच्या मोठ्या मुलाचे लग्न झालेले असून दुसऱ्या मुलाचे लग्न होणार होते. तसेच इम्रान याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी वर्षभरापासून माहेरी राहते.

आपली प्रतिक्रिया द्या