ऑ… काय म्हणताय ! 29 वर्षांत जगातील 25 टक्के लोकं बहिरी होणार

मानवी शरीरातील सर्वच अवयव संवेदनशील असतात. यापैकी एक अवयव म्हणजे ‘कान’. येत्या काही वर्षांत ऑ…काय म्हणताय! असे एकमेकांना विचारण्याची वेळ जगभरातील लोकांवर येण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या 29 वर्षांत जगातील 25 टक्के लोकं बहिरी झाली असतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

कानावर परिणाम झाला तर दैनंदिन कामकाजावरही परिणाम होतो. कानाद्वारे विविध प्रकारची माहिती ग्रहण करायला मदत होते. मात्र 2050 पर्यंत 25 टक्के लोकांना कानांच्या विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागणार आहे. म्हणजे जगातील चार लोकांपैकी एक व्यक्ती बहिरी होऊ शकते अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

कानात जंतुसंसर्ग होणे, कान दुखणे, जन्मत: बहिरेपण असणे किंवा कमी ऐकू येणे यामुळे बहिरेपणाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज वर्तवला जात आहे. ही भीती ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने कानाच्या या समस्या वेळीच दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, कानांच्या तक्रारींवर उपायोजना करण्यासाठी दरवर्षी एका व्यक्तीकरिता अंदाजे 1.33 डॉलर खर्च होतो. यामुळे एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे नुकसानही सहन करावे लागते.

उपचारांबद्दलच्या योग्य माहितीचा अभाव
बहिरेपणाच्या समस्येवरील उपायांचा, योग्य औषधोपचारांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. ज्या देशांचे उत्पन्न कमी आहे, त्या देशांत कानांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. ज्या देशांचे उत्पन्न कमी आहे अशा देशांमध्ये बहिरेपणाचे प्रमाण खूप जास्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. गरीब देशातील कानाची समस्या असलेल्यांना योग्य औषधोपचार आणि सुविधा मिळत नाहीत. याऊलट श्रीमंत देशांमधील नागरिकांना आधुनिक उपचार घेणं परवडतं. ज्यामुळे श्रीमंत देशात कानाची समस्या किंवा बहिरेपण येण्याचं प्रमाण कमी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या