धक्कादायक…जमिनीच्या हव्यासापोटी सख्ख्या भावाने बहिणीला गोळ्या घातल्या

पंजाबमधील होशियारपूर येथे सख्ख्या भावानेच बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

22 एप्रिल रोजी होशियारपूर येथील सीकरी येथे मनप्रीत कौर नावाच्या तरुणीची हत्या करण्यात आली. या तरुणीने 8 वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध होशियारपूरमधील खडियाला गावातील पवनदीप सिंह या तरुणासोबत लग्न केले होते. लग्नानंतर सासरच्यांशी न पटल्याने तिची घटस्फोटाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. घटस्फोटानंतर मनप्रीतला तिच्या माहेरी परत जायचे होते, मात्र तिचा भाऊ हरप्रीत सिंहचा याला विरोध होता.

स्थानिक पोलीस अधिकारी नवज्योत सिंह माहल यांनी सांगितले की, बहिणीने मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे झालेला अपमान आणि तिच्या वाट्याची जमीन बळकवण्याच्या हेतूने मनप्रीत कौरचा छोटा भाऊ हरप्रीत सिंह याने बहिणीला ठार करण्याचे षड्यंत्र रचले.

बहिणीचा खून करण्याच्या एक दिवस आधी आरोपींनी हत्येची योजना आखली. दुसऱ्या दिवशी गाडीने खडीयाल गावात पोहोचले. हरप्रीत सिंहचा मित्र इकबाल गाडी चालवत होता आणि हरप्रीत मागच्या सीटवर बसला होता. या दोघांनी मनप्रीतला व्हॉटस अॅप कॉल करून आम्हाला भेटायला ये. महत्त्वाचे काम आहे, असे सांगितले. ती गावाच्या मुख्य रस्त्यावर हरप्रीतला भेटायला गेली तेव्हा त्याने मागून तिचा गळा दाबला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यांनी तिला गाडीत घालून सीकरी गावात नेले. तेथे हरप्रीतने त्याच्याकडील बंदूकीने आपल्या बहिणीवर 9 गोळ्या झाडून तिला ठार केले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरप्रित सिंह आणि त्याचे दोन मित्र यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडील बंदूक आणि 3 गाड्या जप्त केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या