उंदरांचा सुळसुळाटामुळे या देशात शेकडो लोक आजारी, कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवले

जगभरात कोरोना साथरोगाचे वातावरण असताना ऑस्ट्रेलियात उंदरांनी दहशत निर्माण केली आहे. येथील शेकडो लोक उंदिर चावल्यामुळे आजारी पडले आहेत. उंदारांनी धुमाकूळ घातल्यामुळे फॅक्टरीमालक आणि शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत.

उंदरांनी तुरुंगातील विजेच्या तारा कुरतडल्या आणि छतावरील पॅनल तोडले. त्यामुळे न्यू साऊथ वेल्समधील वेलिंग्टन सुधारगृहातील 420 कैदी आणि 200 कर्मचाऱ्यांना उंदरांच्या दहशतीमुळे दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले. उंदरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून तुरुंग परिसरात आणि छतावर जागोजागी उंदिर मरून पडले आहेत. काही उंदिर सडल्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकरिता कैदी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिक जबाबदारी असल्यामुळे दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी येथील पीटर सेवरिन या समाचार एजंसीला दिली आहे.

मोठ्या प्रमाणात पैदास झालेल्या उंदरांनी शेतीपिकांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गोदामात ठेवलेली धान्येही त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. येथील घरं, शाळा आणि रुग्णालयातही उंदरांनी दहशत निर्माण केली असून लोकांच्या अंथरुणातही उंदिर सापडत आहेत. मरून पडलेले उंदिर आणि त्यांच्या मलमूत्रामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टाक्याही प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे येथील लोकांच्या आजारापणात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयातील रुग्णाच्या आरोग्याचा प्रश्नही उंदरांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बर्‍याच जणांना उंदरांशी संबंधित आजार असल्याचे आढळले आहे, त्याबद्दल डॉक्टर अभ्यास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या