‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केलेल्या मुलीला जेवायला बोलावलं, खाऊ-पिऊ घालून निर्घृणपणे संपवलं

हरयाणामध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली असून प्रेमविवाह केलेल्या मुलीला पित्याने घरी जेवणासाठी बोलावले आणि खाऊ-पिऊ घालून तिची निर्घृणपणे हत्या केली. सोनीपत जिल्ह्यातील मुकीनपूर गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, येथील 18 वर्षीय मुलीने गेल्या वर्षी प्रेमविवाह केला होता. काही महिन्यांनी तिच्या पित्याने वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तिला घरी जेवायला बोलावले. जेवणानंतर पित्यानी ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह उत्तर प्रदेशमधील मेरठ जवळ गंगानदीत फेकला. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.

व्हिडीओमुळे झाला खुलासा

मुनीकपूर येथील वेदप्रकाश याने गेल्यावर्षी 24 नोव्हेंबर, 2020 ला गावातीलच एका 18 वर्षीय तरुणीशी आर्य समाजाच्या मंदिरात प्रेमविवाह केला होता. यानंतर कोर्टामध्ये लग्नाची नोंदही केली होती. लग्नानंतर दोन दिवसांनी तरुणी माहेरी आली आणि या दरम्यान तिने घरच्यांना आपण प्रेमविवाह केल्याचेही सांगितले. त्यानंतर 3 जून 2021 रोजी पतीच्या घरी गेली. 6 जुलैला तिच्या पित्याने (विजयपाल) वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलावले. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. याच दरम्यान तरुणीने आपल्या पतीला एक व्हिडीओ पाठवला होता आणि पित्यासह चौघांपासून जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. या व्हिडीओमुळेच हत्याकांडाचा खुलासा झाला.

गुन्हा केला कबूल

वेदप्रकाश याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि तरुणीच्या पित्याला अटक केली. विजयपाल यांनीही खून केल्याचे कबूल केले. मावशीच्या मुलासोबत मिळून ओढणीने गळा दाबून तिच्या हत्या केल्याचे विजयपाल यांनी सांगितले. यानंतर मृतदेह मेरठजवळ गंगा नदीत फेकल्याचीही कबुली त्यांनी दिली, अशी माहिती पोलीस अधिकारी बिजेंद्र सिंह यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या