हिंदुस्थानातील ५८ टक्के संपत्ती १ टक्के श्रीमंतांकडे, तर जगातील अर्धी संपत्ती ८ लोकांकडे!

सामना ऑनलाईन । डावोस

हिंदुस्थानातील एकूण ५८ टक्के संपत्ती देशातील एक टक्के श्रीमंत उद्योगपत्तींकडे तर जगातील अर्धी संपत्ती फक्त ८ लोकांकडे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक स्वित्झर्लंडच्या डावोस शहरात होत असून जगातील सर्व लक्ष्मीपुत्र तेथे हजर रहाणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या बैठकीला हिंदुस्थानातून जाणाऱ्या उद्योगपतींची यादी आणि त्यांच्या संपत्तीचा तपशील “अॅन इकॉनॉमि फॉर नाईन्टी नाईन पर्सेंट” या नावाने तयार केलेल्या अहवालात हिंदुस्थानातील एकूण संपत्तीपैकी ५८ टक्के संपत्ती या १ टक्के उद्योगपतींकडे असल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्थानातील ५७ गर्भश्रीमंतांकडे एकूण १५ लाख करोड रूपयांची संपत्ती आहे. हिंदुस्थानातील ७० टक्के लोकांची एकूण संपत्ती जवळ जवळ एवढीच आहे. जगातील एकूण संपत्तीच्या निम्मी संपत्ती ८ श्रीमंतांकडे आहे.

हिंदुस्थानात ८४ अब्जाधिश असून त्यांची एकूण संपती १६ लाख कोटी आहे. अब्जाधिशांच्या यादीतील रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे १ लाख ३१ हजार कोटींची संपत्ती आहे. ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर दिलीप संघवी यांच्याकडे १ लाख १३ हजार कोटी आणि अजीज प्रेमजी यांच्याकडे १ लाख २ हजार कोटी रूपये संपत्ती आहे. हिंदुस्थानातील एकूण संपत्ती २११ लाख कोटी आहे. तर जगाची एकूण संपत्ती १७ हजार ४२७ लाख कोटी आहे. जगाच्या या संपत्तीच्या निम्मी म्हणजे ४ हजार ५०० लाख कोटी रूपयांची संपत्ती ८ धनवानांकडे आहे. यात बिल गेटस् ४ लाख ५ हजार कोटी आणि वॉरेन बफेट ४ लाख १४ हजार कोटी यांचा समावेश आहे.