मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपदावर वर्णी लावत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेगडे यांनी महामंडळाचे उपाध्यक्षपद नाकारत निवडणूक लढविण्याची ठाम भूमिका घेतली आहे. उलट त्यांनी उमेदवारीची आग्रही मागणी करत पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल. उमेदवारी नाही मिळाली तर कार्यकर्त्यांसोबत एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मावळच्या उमेदवारीचा गुंता वाढला आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला स्थापनेपासून यश येत नव्हते. त्यामुळे 2019 मध्ये भाजपमधून आलेले सुनील शेळके यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. ते मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. आता पक्षाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. आमदार शेळके यांनी एकच वेळा संधी मागितली होती, असा भेगडे यांचा दावा आहे.
भेगडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढविण्यावर ते ठाम आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यालाच उमेदवारी देतील, असा ठाम विश्वास त्यांना आहे. मात्र, विद्यमान आमदारांची उमेदवारी कापणे शक्य नसल्याने पक्षाने महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन भेगडे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी उपाध्यक्षपद नाकारले. पक्षाकडे कोणतेही पद किंवा महामंडळ मागितले नव्हते. केवळ उमेदवारी मागितली असून, त्यासाठी मी आग्रही आहे. भेगडे उमेदवारीवर ठाम असल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे.