पालिका रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार बासमती राइस, दर्जेदार पिठाच्या चपात्या!

26

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिका रुग्णालयांमधील रुग्णांना आता बासमती राइस आणि ‘लोकवन’ गव्हाच्या पिठाच्या दर्जेदार चपात्या मिळणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत आज मंजूर झाला. यासाठी पालिकेने एका वर्षासाठी १ कोटी ३८ लाख ४८ हजारांचे कंत्राट दिले आहे.

मुंबई महापालिकेची केईएम, नायर, शीव अशी तीन प्रमुख तर पूर्व व पश्चिम उपनगरात एकूण १७ रुग्णालये आहेत. पालिका रुग्णालयांतील रुग्ण हे गोरगरीब असतात. या रुग्णांना दर्जेदार आहार देण्यासाठी बासमती तांदूळ आणि ‘लोकवन’ कंपनीचे गव्हाचे पीठ वापरण्यात येणार आहे. गव्हाचे पीठ रु. २२.९५ प्रति किलो, तर बासमती तांदूळ रु. ४२.४०ना खरेदी करण्यात येणार आहे. या दोन्ही वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा कमी दराने करण्यात येणार आहे.

आधी दर्जा तपासा, नंतरच रुग्णांना द्या
रुग्णांना बासमती राइस आणि लोकवनच्या चपात्या देताना दररोज आहारतज्ञांकडून तपासणी केल्यानंतर वितरण करा अशी मागणी आशीष चेंबूरकर यांनी केली. तर रुग्णांना देण्यात येणारा बासमती राइस दर्जेदार असावा अशी मागणी मंगेश सातमकर, राजुल पटेल यांनी केली. या कामाचे कंत्राट देताना महिला बचत गटांना संधी का देण्यात आली नाही, असा सवाल शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या