आता नव्या ..भूमिकेत!

62

नितिन फणसे

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य… नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यांसमोर उभा राहतो ‘घातक’ सिनेमातील ममता कुलकर्णीच्या ‘कोई जाए तो ले आए’ या आयटम साँगमधला, लठ्ठ असूनही बिनदिक्कत नृत्याच्या स्टेप्स करणारा अभिनेता… याच गणेशजींनी ‘भिकारी’ सिनेमाद्वारे केवळ सिनेमा निर्मितीच नाही तर दिग्दर्शनातही पाऊल ठेवलंय. या सिनेमासाठी त्यांनी आपल्या २००किलो वजनापैकी ८६ किलो वजन घटवलं. नृत्य दिग्दर्शन ते सिनेमाची निर्मिती या प्रवासाबद्दल त्यांनी भरभरून गप्पा मारल्या.

निर्मिती आणि दिग्दर्शन करायचं मी आधीच ठरवलं होतं. फक्त चांगल्या कथेच्या शोधात होतो. आई आणि तिच्या मुलाचं कथानक मिळालं आणि लगेच सिनेमाच्या निर्मितीला हात घातला, असं ते सांगतात. आचार्य यांच्या ‘भिकारी’ या सिनेमात स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे. रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, गुरू ठाकूर, कीर्ती आडारकर, सुनील पाल वगैरेंच्या भूमिका आहेत. अब्बास अली मोगुल यांनी ऍक्शन दृश्ये दिली आहेत. गुरू ठाकूर यांनी पटकथा संवाद लिहिलेत. एक मस्त एंटरटेनर फिल्म आहे. कौटुंबिक फिल्म आहे. सगळ्यांना आवडेल अशी आहे. गणपती येत आहेत. यात एक भव्यदिव्य गणपतीगीत आहे. कॉमेडी, रोमान्स, ऍक्शन आहेतच, पण यात इमोशन्स जास्त दिसतील. आईसाठी एक श्रीमंत मुलगा भिकारी बनतो अशी खरी गोष्ट आहे.

गणेश आचार्य हे उत्तम कोरिओग्राफर आहेतच. सिनेमा निर्मिती आणि दिग्दर्शन यात उतरले असले तरी यातही त्यांचा डान्स, त्यांची कोरिओग्राफी पाहायला मिळणारच आहे. यातील गणपतीच्या गाण्याची कोरिओग्राफी त्यांनीच केली असून ते स्वतःही त्यात नाचले आहेत. ते पाहायला खरोखर मजा येईल. मराठी व हिंदी चित्रपटांत काय फरक जाणवला असं विचारता ते म्हणतात, काहीच फरक जाणवत नाही. म्हणूनच तर हिंदीत कोरिओग्राफर म्हणून बरंच काम केल्यावरही मराठीत सहजतेने सिनेमा बनवला. वजन घटविण्याबाबत त्यांनी म्हटले की, माझं वजन खरंच खूप वाढलं होतं… पण ‘भिकारी’साठी मुद्दाम वजन घटवलं. यासाठी स्वीमिंग केलं, जिम केलं. खूप व्यायाम केला.

हिला सिनेमा मराठीतच…माझा जन्म चाळीत झालाय. महाराष्ट्रात राहतोय. माझी आई मराठी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मराठी भाषेबद्दल एक ओढ, आस्था होती. शिवाय आजकाल हिंदी भाषेतील सिनेमांसारखंच मराठी सिनेमांनाही चांगलं यश मिळतंय. मराठी सिनेमे कुठेही कमी नाहीत. त्यामुळे पहिला सिनेमा बनवायचा तो मराठीतच असं ठरवलं होतं. भाषा कोणतीही असली तरी बॉलीवूडमधल्या मोठमोठय़ा कलाकारांनीही या सिनेमाच्या प्रमोशनला, म्युझिक रिलीजला हजेरी लावली आहे.

आजचा मराठी सिनेमा आशयघन..आजच्या मराठी सिनेमाबद्दल वाईट कुणी बोलूच शकणार नाही. कारण आजचा मराठी सिनेमा आशयघन आहे. सिनेमात आशय असेल तर त्याला हमखास यश मिळते. कॉमेडीही चांगली असायला हवी. अशोकमामांचा ‘शेंटीमेंटल’ येतोय. ‘हृदयांतर’ नुकताच येऊन गेला. कंटेंट असलेले सिनेमे जास्तीतजास्त असतात ते फक्त मराठीतच… सिनेमाच्या यशापयशाबद्दल आपण सांगू शकत नाही, पण चांगल्या कंटेंटचे सिनेमे देणं आपल्या हातात असतं. अलीकडचे मराठी सिनेमे चांगले विषय घेऊन आले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या