पावसाची टकटक; येत्या २४ तासांत कोकण, गोव्यात मुसळधार

13
फाईल फोटो

सामना ऑनलाईन,मुंबई

टांग देणार म्हणता म्हणता पावसाने पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्राला हूल दिली आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरात आणि रायगड, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून दोन–तीन दिवसांत येईल असे अंदाज हवामान विभाग व्यक्त करत असतानाच आज पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण ठेवून अधूनमधून बरसत केवळ टकटक दिली.

हवामान विभागाने पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकदा भाकिते वर्तविली, परंतु ठरलेल्या तारखेला पाऊस आलाच नाही. मुंबईत मान्सून दाखल होण्याची १४ जून ही तारीख ठरली आहे. त्यामुळे आता आणखी काही दिवस तरी पावसाचे तोंड पाहायला मिळणार नाही या विचारानेच मुंबईकर हैराण झाले होते. परंतु आज सुखद धक्का देत पावसाने मुंबईसह उपनगरात बरसत उकाडय़ाने त्रस्त झालेल्यांना  चांगलाच दिलासा दिला. रायगड, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मान्सूनची वाटचाल समाधानकारक असून तो वेगाने पुढे सरकतो आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज राज्याच्या कृषी विभागाचे माजी सल्लागार आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

येत्या २४ तासांत दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता.

मुंबईत आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण.

आर्द्रता वाढणार असल्याने उकाडा सतावणार.

आपली प्रतिक्रिया द्या