प्रगतिशील देशांच्या यादीत हिंदुस्थान कुठे?

273

>>मुजफ्फर हुसेन

इतिहासकाळात हिंदुस्थानात सोन्याचा धूर निघत असे. आज हिंदुस्थान विविध मार्गाने प्रगती करीत असतानाही युनेस्को ही जागतिक संघटना दरवर्षी प्रगतिशील राष्ट्रांची जी यादी प्रसिद्ध करते, यंदाच्या त्या यादीत हिंदुस्थानचे स्थान अतिशय तळाला गेल्याचे दाखवले आहे. ही यादी पाहता हिंदुस्थान खरोखरच एवढा मागास आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. जग काहीही म्हणत असले तरी हिंदुस्थानने जे लोकशाही, व्यक्ती, समाज आणि धर्मस्वातंत्र्य जपले आहे त्याला जगात तोड नाही.

एक काळ असा होता की हिंदुस्थानात सोन्याचा धूर निघत असे, पण आज जागतिक प्रगतिशीलतेच्या बाबातीत हिंदुस्थान एवढय़ा तळाशी दर्शविलेला आहे की, या यादीत हिंदुस्थानपेक्षा अधिक मागास केवळ पाचच राष्ट्रे आहेत. आमच्या देशाचा यापेक्षा अधिक अपमान तो कोणता असावा? ही यादी पाहता सुरुवातीला तर असे वाटते की कुठेतरी ही यादी चुकलेलीच आहे, परंतु अधिक खोलात जाऊन वस्तुस्थिती पाहता आपली मान खाली गेल्याशिवाय राहत नाही.

संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी एक अहवाल सादर करीत असतो ज्यात हे स्पष्ट केलेले असते की, मानव विकासासाठी आवश्यक गोष्टींचे संवर्धन करण्याच्या बाबतीत प्रत्येक देश किती प्रगतिशील आणि इतरांपेक्षा पुढे आहे? २०१७च्या या अहवालात हिंदुस्थानचा खालून सहावा क्रमांक आहे. जगभरातील प्रगतिशीलतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एकूण १२२ देशांच्या यादीत हिंदुस्थानचा क्रमांक तब्बल ११७ वा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे स्थान आणखी ४ ने खाली घसरलेले आहे. ही यादी पाहता हिंदुस्थान एवढा मागास का आहे याविषयी केवळ हिंदुस्थानलाच नव्हे तर जगातील इतर अनेक देशांनाही वाईट वाटले. एक हिंदुस्थानी म्हणून आपली मान खाली होणे, मागच्या वर्षापेक्षा आणखी खाली गेल्याचे दुःख होणे स्वाभाविक आहे.

हिंदुस्थानात सध्या मोदींचे सरकार असताना असा अहवाल यावा याचे जगाला अधिक आश्चर्य वाटते. हिंदुस्थानात सर्वत्र विकासाच्या बाता सुरू आहेत. जगसुद्धा प्रभावित झाले आहे. परंतु या अहवालाने आम्हाला असेही दाखवून दिले आहे की, केवळ चांगले कपडे घातल्याने  फार दिवस आपण आपली वस्तुस्थिती झाकून ठेवू शकत नाही. शरीर कुपोषित, अविकसित असेल तर ते आज ना उद्या उघडकीस येणारच. त्यामुळेच आपल्या दुबळेपणाविषयी आत्मनिरीक्षण करावेच लागणार आहे. जगातील सर्वात सुदृढ लोकशाहीच्या बाबतीत हिंदुस्थान तिसऱ्या स्थानी आहे.

आज स्पर्धेचे युग आहे. अशा वेळी काही कमतरता दिसत असेल तर तीसुद्धा दूर करायला हवी. जनता ‘अच्छे दिन’ची वाट पाहत असल्यामुळे बाहेरच्या आवरणासोबतच आम्हाला आतील शरीरही सुदृढ केले पाहिजे. हिंदुस्थान एवढ्या खालच्या पातळीवर जावा ही काही साधारण गोष्ट नाही. राजकारण बाजूला ठेवून आम्हाला यावर चिंतन करायला हवे. नोटाबंदी लादण्यात आली तेव्हा असे वाटले होते की हिंदुस्थानची अर्थव्यवस्था काही एवढी कमजोर नाही. परंतु आता जगाने आपल्याला आरसा दाखवल्यानंतर वस्तुस्थिती कबूल करावीच लागेल. चलनवाढीचा एक अर्थ असाही होतो की आम्हाला अधिक मेहनत करावीच लागणार आहे.

सत्ता बनवणे, उलथवणे आणि पक्षपातळीवरील फेरबदल या गोष्टी वेगळ्या आणि सर्वांगीण विकास वेगळा. त्यावर खरे तर देशाची आर्थिक प्रगती अवलंबून आहे. मोदी सरकार राजकीयदृष्ट्या आपली छाप पाडण्यात यशस्वी झाले खरे, परंतु आर्थिक रूपात देशाला समृद्धी प्रदान करण्याची परीक्षा मात्र होणे बाकी आहे. हिंदुस्थान सध्या जगात ज्या अभिमानाने जगतोय त्यामागे संपूर्ण राष्ट्राची मेहनत कारणीभूत आहे. आज दक्षिण आशियात आम्ही आपला झेंडा रोवला खरा; परंतु जगात नंबर वन हे उद्दिष्ट फार दूरच आहे.

सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळणे आता फार अवघड वाटत नाही. खरे तर सुखी देशांच्या स्पर्धेत हिंदुस्थान काही फारसा मागास राहिलेला नाही. तरीसुद्धा काही बाबतीत भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि चीन ही राष्ट्रे हिंदुस्थानपेक्षा अधिक सुखी आहेत असे ही यादी सांगते. हिंदुस्थान प्रगतिशील आहे हे आपण सांगू शकत असलो तरी चीनशी मात्र बरोबरी करूच शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची मूल्यांकन पद्धती निर्विवाद आहे. कारण त्यांची सर्वेक्षण व मूल्यांकनाची पद्धत अतिशय वैज्ञानिक असते. त्यांचे सर्वेक्षण तटस्थ आणि न्यायिक आहे. प्रत्येक देशाची स्थिती मोजण्याचे सहा मापदंड त्यांनी ठरवलेले आहेत. सुशासन, दरडोई उत्पन्न, आरोग्य, विश्वास, स्वातंत्र्य आणि उदारता या त्यांच्या कसोटय़ा आहेत. या कसोट्यांवर हिंदुस्थान मागे फेकला गेलेला आहे. त्यामुळे केवळ सरकारनेच नव्हे तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने विचार करायला हवा की आपण कुठे आणि कोणत्या बाबतीत कमी पडतो?

हिंदुस्थानात असंख्य जाती व अनेक धर्म आहेत. प्रत्येक जातीधर्मानुसार आस्था आणि विश्वास आहेत. प्रत्येकाला आपल्या परंपरेनुसार त्याचे पालन करता यावे हे स्वातंत्र्य असणे ही बाब काही सोपी नाही. प्रत्येकाला एकाच वेळी पूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेची वागणूक देणे हेही सोपे नाही. हिंदुस्थानात जेवढी विविधता पाहायला मिळते तेवढी जगातील कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही. अशा वेळी हिंदुस्थान दहावीस गुणांनी मागे राहिल्यास फारशी फिकीर बाळगण्याची गरज नाही. हिंदुस्थानबाहेर राहून हिंदुस्थानविषयी काहीही वक्तव्य करता येईल. परंतु हिंदुस्थानात प्रत्येकाला त्याच्या अस्मितेच्या जपणुकीचे स्वातंत्र्य राखणे ही बाब अतिशय कठीण आहे.

ज्यांची तीर्थक्षेत्रे हिंदुस्थानबाहेर आहेत असे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा अनेक धर्माचे लोक हिंदुस्थानात राहतात. हिंदुस्थान प्रत्येकाच्या आस्थेनुसार त्यांची व्यवस्था करतो. हे सहजतेने करता येण्यासारखे नाही. हिंदुस्थानप्रमाणे जगातील कोणता देश सर्व धर्मांचा अशा प्रकारे सन्मान करीत असेल बरे! जवळपास प्रत्येक जाती आणि समाजाचे आपले पर्सनल लॉ आहेत. त्याकडे हिंदुस्थानी सरकारने कानाडोळा केलेला नाही. बहुसंख्याकांना मिळणारे अधिकार अल्पसंख्याकांनाही मिळतात. राष्ट्रसंघानेही याबाबत आपली प्रशंसा केलेली आहे. विदेशी लोक हिंदुस्थानला सुट्ट्यांचा देश म्हणतात. त्यावरून लक्षात येते की हिंदुस्थानचे हृदय किती विशाल, व्यापक आहे! हिंदुस्थानात असा कोणता पंथ किंवा समूह आहे ज्यांच्या सणासाठी हिंदुस्थानने सुट्टी दिलेली नाही? प्रत्येक धर्म, पंथ, समूहाला त्याच्या परंपरेप्रमाणे वस्त्र वापरण्याचे, आस्था जपण्याचे स्वातंत्र्य आहे. एवढ्या विशाल मनाचा आणि सहिष्णू हिंदुस्थानशिवाय जगात दुसरा देश नसेल.

विविध भाषा आणि त्यांचे साहित्य मोठय़ा प्रमाणात आपल्या देशात उपलब्ध आहे. हिंदुस्थानात जेवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुराण छापले जाते तेवढे तर सौदी अरब, इराण आणि पाकिस्तानातही छापले जात नाही. हिंदुस्थानसारखा धर्मरक्षक देश जगात दुसरा नाही. एकेकाळी युरोपमधील नॉर्वे, स्वीडन आणि फिनलॅन्डचे नाव होते, परंतु आता ते मागे पडले आहे. एकेकाळी नैसर्गिक सौंदर्यासाठी स्वित्झर्लंड ओळखला जात असे, परंतु आज त्यांची तशी ओळख राहिली नाही. आर्थिक प्रगतीसोबतच मानवीय संवर्धनाच्या बाबतीत जगात हिंदुस्थानसारखे राष्ट्र नाही. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना जगाला हे सांगण्याची आवश्यकता आहे की, शेजारी राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणांनंतरही हिंदुस्थानने मानवकल्याणाच्या बाबतीत विक्रमी कार्य केलेले आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही राष्ट्राच्या तुलनेत हिंदुस्थान मागे नाही, ज्या बाबतीत कमतरता असल्याचे दाखवले जाते, त्याही बाबतीत आगामी काळात आम्ही सारी कसर भरून काढल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे!

 

आपली प्रतिक्रिया द्या