जावेद अख्तर पिफमध्ये देणार व्याख्यान, डॉ. जब्बार पटेल यांची माहिती

ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) वियज तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 10 मार्चदरम्यान आयोजित केलेल्या 20 ‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभागाचे मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक आणि ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समर नखाते, प्रकाश मगदूम आणि मेघराज राजेभोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी आणि चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे, अभिजित रणदिवे यावेळी उपस्थित होते.

डॉ. पटेल म्हणाले, 3 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. उद्घाटन सत्राचे सादरकर्ता म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी , तर पं. सत्यशील देशपांडे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी शर्वरी जमेनीस, गणेश चंदनशिवे व यशवंत जाधव यांचे सादरीकरण होणार आहे. मेघराज राजेभोसले यांनी मराठी स्पर्धा विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली, तर प्रीमिअर होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये वर्तुळ, अवकाश, इन्स्टिस्ट्युट ऑफ पावटोलॉजी, जननी, राख-सायलेंट फिल्म आणि रंगांध आदी चित्रपटांचा समावेश आहे. पिफ-2022चा रेट्रोस्पेक्टिव्ह व दिग्दर्शक सत्यजित रे आणि इटालियन चित्रपट क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव असलेले पीअर पाओलो पासोलिनी यांना समर्पित केला जाणार आहे.