परळीत पहिल्याच पावसात रस्त्यांचे झाले तळे

61

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी शहरातल्या रस्त्यांचे हाल पहिल्या पावसातच झाल्याचे समोर आले आहेत. जुन्या गावाचा मुख्य भाग असलेल्या गणेशपार, संत सावतामाळी मंदिर, भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकातच पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या चौकातच एक शाळाही असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय पाऊस झाल्यास होते. पहिल्या पावसातच रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून आली.

संत सावतामाळी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठे हाल झाले असून या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. हा रस्ता नवरात्र उत्सवात काळरात्री मंदिराकडे जाण्यासाठी वापरला जातो. या रस्त्याला जोडणाऱ्या चौकातही अक्षरशः पावसानंतर चिखलाचे तळे साचते. या चौकातील एक रस्ता भाजी मंडईकडे जाणारा असल्याने या चौकात झालेला खड्डा बुजविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे या चौकातच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक यांचे घर आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर ते तळ रस्त्यावरही खड्डे पडल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. काही दुर्घटना होण्याआधीच या रस्त्यांची दुरुस्ती होण्याची गरज निर्माण झाली आहे.

कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची गरज
दरम्यान नगरोत्थान योजनेत झालेल्या रस्त्यांच्या कामात विविध ठिकाणी पाईपलाईन साठी काँक्रिटिकरण केले गेले नाही. यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. पावसाळयात याच खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागतो.पाऊस झाल्यास न.प.कडून याची तात्पुरती डागडुजी केली जाते,मात्र या सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची कायस्वरूपी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या