देशातील ‘या’ राज्यात एकापेक्षा जास्त मुले जन्माला घालणाऱ्या महिलांना मिळणार बक्षीस, सरकार देणार पगार वाढ

sikkim

दोन किंवा अधिक मुलांना जन्म देणाऱ्या सिक्कीममधील महिला सरकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त पगारवाढ मिळेल आणि घरीच बालसंगोपन करणार्‍यांना अतिरिक्त वेतन मिळेल, असे राज्याने जाहीर केले आहे. देशातील सर्वात कमी प्रजनन दर आणि लोकसंख्या कमी होत असल्यानं राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी दुसऱ्या मुलाला जन्म देणाऱ्या महिलांसाठी विशेष पगारवाढ आणि तिसऱ्या मुलाला जन्म देणाऱ्या महिलांसाठी दुप्पट वाढ पगार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

‘स्थानिक लोकसंख्येमध्ये कमी प्रजनन दर हा सिक्कीममधील गंभीर चिंतेचा विषय आहे… ही प्रक्रिया उलट करण्यासाठी आपण आपल्या हातात सर्वकाही केले पाहिजे’, असं तमांग यांनी शुक्रवारी गंगटोक येथे एका कार्यक्रमात सांगितलं.

अवघ्या 7 लाख लोकसंख्येसह हिंदुस्थानातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य, सिक्कीम अनेक वर्षांपासून कमी प्रजनन दर (TFR) सोबत संघर्ष करत आहे. सरकारी नोंदीनुसार, 2022 साठी 1.1 आकड्यासह सिक्कीममध्ये देशातील सर्वात कमी TFR आहे. याचा अर्थ असा की, सिक्कीममधील महिलांना एकपेक्षा जास्त मूल होत नाही. त्या तुलनेत, 2022 मध्ये राष्ट्रीय प्रजनन दर 2.159 प्रति माता इतका होता.

अलिकडच्या वर्षांत सिक्कीमच्या 12 पैकी किमान दोन स्थानिक समाजांची – ‘भुतिया’ आणि ‘लिंबू’ – यांची लोकसंख्या कमी होत आहे, असे राज्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

यावर उपाय म्हणून सिक्कीम सरकारने महिला सरकारी कर्मचार्‍यांच्या घरी अर्भकांची काळजी घेण्यासाठी चाइल्ड केअर अटेंडंट उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री तमांग म्हणाले की, 40 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिलांना कामावर घेतले जाईल आणि एका वर्षासाठी अर्भकांची काळजी घेण्यासाठी महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी पाठवले जाईल. परिचरांना दरमहा ₹ 10,000 मानधन दिले जाईल.

मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकसंख्येला चालना देण्यासाठी अधिक मुले जन्माला घालण्यासाठी स्थानिक समुदायातील महिलांसाठी आर्थिक आणि इतर सवलती जाहीर केल्याच्या एका आठवड्यानंतर हा प्रस्ताव आला आहे.

देशात अधिक लोकसंख्येशी लढा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पालकांना दोन मुलांवरच थांबवण्यास प्रवृत्त केले आहे. त्याचवेळी ईशान्येकडील राज्य कुटुंबांना तीन मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाकडे वळत आहेत.

नोव्हेंबरमध्ये, सिक्कीमने महिलांसाठी वर्षभराची प्रसूती रजा, पुरुषांसाठी महिन्याभराची पितृत्व रजा आणि इन-व्हिट्रो फर्टिलायझेशनद्वारे गर्भधारणा करू इच्छिणाऱ्यांसाठी आर्थिक मदत यासारख्या प्रोत्साहनांची घोषणा केली.