कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे लोकार्पण संपन्न

कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आजपासून कोकण रेल्वेमार्गावरून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथून हिरवा झेंडा दाखवला. कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे आता पर्यावरणपुरक हरित आणि स्वच्छ रेल्वे वाहतूक सुरु होणार आहे. बंगळूर येथील कार्यक्रमात कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेमार्गावरील प्रवास तर सुरळीत होईलच पण त्याचबरोबर अन्य व्यवसायांनाही चालना मिळेल. हा प्रकल्प म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोदगार त्यांनी काढले.

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रत्नागिरी रेल्वे स्थानकात आयोजित करण्यात आला होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळूर येथील हा लोकार्पण सोहळा दाखवण्यात आला. रत्नागिरी येथील कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, मिरजोळेचे सरपंच गजानन गुरव, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या 741 किमी मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सहा टप्यात पूर्ण करण्यात आले. मार्च 2022 मध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर मालगाड्या वीजेवर धावू लागल्या. कोकण रेल्वेचा हा भूभाग अवघड असल्यामुळे या मार्गावर विद्युतीकरणाचे काम करणे जिकीरीचे होते. मात्र कोकण रेल्वेने ते यशस्वीपणे पार पाडले. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास आता पर्यावरणपूरक आणि वेगवान होणार आहे.