दिग्गजांच्या हस्ते मनोहर जोशींच्या पुस्तकाचे प्रकाशन

59

सामना ऑनलाईन । मुंबई

राजकारणी, उद्योजक, लेखक अशा विविध क्षेत्रांत मनोहर जोशी यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. कर्तृत्वाला वयोमान नसते हे ‘अवघे पाऊणशे वयमान’ या पुस्तकात जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतींतून समोर येते. कर्तृत्ववान व्यक्तींच्या अनुभवांचा ठेवा असलेले हे पुस्तक तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गजांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांना शुभेच्छा दिल्या.

माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘अवघे पाऊणशे वयमान’ या पुस्तकाचे प्रकाशन आज दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाले. पंचाहत्तरी ओलांडलेल्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह या पुस्तकात आहे. वयावर आपला रिमोट कंट्रोल चालत नाही, पण मनाने तरुण राहा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असत याची आठवण करून देतानाच उद्धव ठाकरे यांनी जोशी यांचे पुस्तक तरुण पिढीसाठी विचारांचे गाईड ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

पुस्तकातील व्यक्ती वृद्ध असल्या तरी कार्यरत आहेत, कारण माणूस मनाने थकला की खऱ्या अर्थाने वृद्ध होतो असे ते म्हणाले. या पुस्तकातून वृद्धांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. रुग्णालयात पिडीयाट्रीक वॉर्डप्रमाणे वृद्धांची सेवा करणारा जेरीऑट्रिक वॉर्ड सुरू करण्याकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे असा सल्ला यानिमित्ताने प्रतिभाताई पाटील यांनी दिला. यावेळी शरद पवार यांनी मनोहर जोशी यांच्या कारकीर्दीचा गौरव करताना त्यांना लिहिते राहण्याचा सल्ला दिला. संगीत, साहित्य, संस्कृतीत समृद्ध महाराष्ट्राचं मोठेपण अन्य राज्यांत गेल्यावर प्रकर्षाने जाणवते, असे गडकरी म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री डी. वाय. पाटील, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते सुधीर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते रमेश देव, लेखक डॉ. विजय ढवळे, डॉ. शरद बापट, डॉ. रमेश जोशी, सुमन व्यास, अशोक चिटणीस, माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या