‘तुतारी’ फुंकून ‘तेजस’ निघाली!

29

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असलेल्या अत्याधुनिक ‘तेजस एक्प्रेस’ला आज मुंबईतून ‘जीवाचा गोवा’ करण्याकरिता निघालेल्या प्रवाशांच्या सोबतीने मोठय़ा जोशात रवाना करण्यात आले. कवी केशवसुत यांच्या अजरामर कवितेवरून दादर-सावंतवाडी राज्यराणीचे नामकरणही ‘तुतारी’असे मोठ्या थाटात करण्यात आले. भुवनेश्वर येथून विमानाने येताना तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. परिणामी ३.२५ वा. रवाना होणारी तेजस ४.०५ वा. करमाळीसाठी रवाना झाली. दादर येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध रेल्वे सुविधांचे लोकार्पण झाले.

याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, मुंबईचे विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, महेश केळुस्कर, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, डॉ. श्रीकांत शिंदे, गोपाळ शेट्टी, हुसेन दलवाई, आमदार राहुल नार्वेकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, कोकण रेल्वे संचालक संजय गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रभात सहाय आदी उपस्थित होते.

कणकवली आणि चिपळूणला थांबा मिळावा

तेजसला कोकणात रत्नागिरी आणि कुडाळ हे केवळ दोनच थांबे देण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी यावेळी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सिंधुदुर्गातील कणकवली रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूच्या शेकडो गावांना येथून जाता येते, त्यामुळे कणकवली येथे थांबा देण्याची मागणी केली. तसेच कोकणात जाणारी एसी डबलडेकर जाणार की राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या गाडीची वेळ बदलली तर कोकणातल्या जनतेला ती हवी असून अशा आशयाचे पत्रच सावंत यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले आहे. याशिवाय तीन एमआयडीसी असलेल्या चिपळूणमध्ये देखील तेजसला थांबा द्यावा अशी मागणी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

रवींद्रनाथ टागोर यांच्या गाजलेल्या ‘गीतांजली ’काव्यसंग्रहावरून मुंबईतून ‘गीतांजली एक्प्रेस’ चालविली जाते तर रत्नागिरीचे सुपुत्र असलेल्या कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात ‘केशवसुत’ यांच्या अजरामर ‘तुतारी’या कवितेच्या नावाने एखादी एक्प्रेस का चालवू नये अशी मागणी कोकण साहित्य परिषदेने केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या