
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोर आज संध्याकाळी सातच्या सुमारास दुर्देवी घटना घडली. रस्त्यावरून पायी निघालेल्या चार फुटबॉल खेळाडूंना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने धडक दिली. 80 वर्षीय कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. जखमींपैकी दोघा तरुणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
प्रवीण गुप्ता (18), अजय गुप्ता (18) सद्दाम अन्सारी (17) आणि विजय राजभर (18) अशी जखमी झालेल्या त्या चौघांची नावे आहेत. हे चौघेही शिवडी व रे रोड परिसरात राहतात. हे चौघेही कुलाबा येथील वायएमसीए येथील मैदानात गोलार इंडियन फुटबॉल अकादमीसाठी खेळतात. मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस ते तेथे फुटबॉलचा सराव करण्यासाठी जातात. त्यानुसार आजही चौघेजण सरावासाठी गेले होते. सराव आटोपून घराकडे जाण्यासाठी चौघेही सीएसएमटी येथील मॅकडोनल्ड्ससमोरील रस्त्यावरून चालत जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या टाटा टियागो या भरधाव कारने त्यांना उडवले. त्या ठिकाणी पोलिसांची बस उभी असल्याने कार बसवर जाऊन आदळल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र कारच्या धडकेत अजय, प्रवीण, सद्दाम आणि विजय हे जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले; परंतु अजय आणि प्रवीण यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तर विजयला किरकोळ दुखापत झाली असून सद्दामला जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. कार चालक दिलीप चेतवानी (80) हे आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात असून कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नेमके काय घडले…
माहीमला राहणारा दिलीप चेतवानी हा वृद्ध त्याच्या टाटा टियागो कारने सीएसएमटी जंक्शन येथून घराच्या दिशेने निघाला होता. सिग्नल ओलांडल्यानंतर चेतवानीने कार वेगात नेली. परिणामी एका गाडीला धडक दिल्याने चेतवानी गडबडला आणि ब्रेक लावण्याऐवजी एक्सलेटर दाबून ठेवले. परिणामी कारने चौघांना उडवले. त्यानंतर भरधाव कार तेथे उभ्या पोलीस बसला धडकली. त्यामुळे गाडी थांबल्याने पुढील अनर्थ टळला. गाडीतल्या हवेच्या बॅग बाहेर आल्याने दिलीप चेतवानी बचावला. मात्र चेतवानीने भरधाव कार चालवल्यामुळे चौघा मुलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.