अवकाळी पावसाने साडेचार हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

18

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ६४ गावांमध्ये रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने तब्बल साडेचार हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान कोट्यवधी रुपयांचे असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्याच्या बहुतांश भागाला रविवारी दुपारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. देवळा, सटाणा, कळवणच्या अनेक गावांना गारपीटीचा तडाखा बसल्याने कांदा, द्राक्ष, डाळिंबबागा, भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली. सटाणा तालुक्यात सर्वाधिक ४० गावांमध्ये पावसासह गारपीटीने थैमान घातले, येथे दोन हजार हेक्टरवरील डाळिंबबागा, आठशे हेक्टरवरील कांद्याचे पीक, पाचशे हेक्टरवरील भाजीपाला व सातशे हेक्टर क्षेत्रावरील इतर पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

देवळ्यात विठेवाडी, सरस्वतीवाडी, भऊरसह सहा गावांमध्ये १६५ शेतकऱ्यांच्या ९९.६५ हेक्टर जमिनीवरील पिकांची दाणादाण उडाली. कळवण तालुक्यातील पूर्व भागाला गारपीटीने झोडपले, यात १३१ शेतकऱ्यांचे ७० हेक्टरवरील पिकांचे, तर निफाडच्या १३ गावांमधील ३२८ शेतकऱ्यांचे २३७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. निफाडमध्ये द्राक्ष काढणी न झालेल्या बागांचे क्षेत्र मोठे होते. सुमारे ६९ हेक्टरवरील द्राक्षबागा, ७८ हेक्टरवरील कांदा व ९० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले.

शिवसेना आमदार अनिल कदम यांनी निफाड तालुक्यातील चेहेडी, चितेगाव येथे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या