सोशल मीडियावरील काळ्या पैशावर आयकर विभागाची नजर

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेसबुक किंवा इनस्टाग्रामवर महागड्या वस्तूंचे फोटो टाकत असाल तर तुमच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी चौकशीसाठी येऊ शकतात. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागाची सोशल मीडियावर करडी नजर आहे. यासाठी आयकर विभाग ‘प्रोजेक्ट इनसाइट’ राबवत असून, याद्वारे सोशल मीडियावर महागड्या वस्तूंची फोटो टाकणाऱ्या युजर्सची चौकशी करण्याची शक्यता आहे.

‘प्रोजेक्ट इनसाइट’ या विशेष मोहिमेमध्ये असे फोटो टाकणाऱ्या व्यक्तीची सर्व माहितीची आयकर विभाग पडताळणी करणार आहे. संबंधीत व्यक्तीचा खर्च आणि त्याच्या घोषित उत्पन्नामधील फरक आयकर विभाग तपासणार आहे. करचोरी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेले उत्पन्न आणि संबंधित व्यक्तीचा खर्च यामधील फरक तपासण्यात येणार आहे.

आयकर विभागाने गेल्या वर्षी ‘प्रोजेक्ट इनसाइट’साठी एल अॅण्ड टी इन्फोटेकसोबत करार केला होता. कर भरणा करण्यात सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार रोखणे आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांना मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या