इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर कांदा घसरला

14

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची घरे, कार्यालये आणि काद्यांच्या खळ्य़ांवर काल इन्कम टॅक्सने अचानक धाडी मारल्या. या छापेमारीमुळे बुधवारी १४०० रुपये प्रतिक्विंटल असलेला कांदा दुसऱ्या दिवशी ९०० रुपये प्रतिक्विंटलवर घसरला म्हणजे तब्बल ३५ टक्क्यांनी कांद्याचे भाव इन्कम टॅक्सच्या धाडीने घसरले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालापैकी ३० टक्के कांदा घेण्याची क्षमता असलेले हे व्यापारी असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी सांगितले. इन्कम टॅक्सच्या धाडी पडलेल्यांमध्ये लासलगावचे दोन कांदा व्यापारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कांदा लिलाव बंद
इन्कम टॅक्सने अचानक केलेल्या या कारवाईने कांदा व्यापार बाजारात खळबळ उडाली. यामुळे कांदा घसरला असेही होळकर यांनी सांगितले. घाऊक मार्केटमध्ये कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी कमी किमतीत कांदा विकायला नकार दिला. यामुळे कांद्याचे लिलाव बंद पडल्याचे होळकर यांनी सांगितले.

द़ुसऱ्या दिवशीही कारवाई
आयकरची कारवाई आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. निर्यातीसह व्यापाऱ्यांचे सर्वच व्यवहार तपासले जात आहे. नाशिक जिह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, चांदवड, उमराणे, सटाणा येथील सात व्यापाऱ्यांवर गुरुवारी पहाटेच आयकरच्या पथकाने छापे टाकले. निवासस्थान, कार्यालय, कांदा साठवणुकीचे खळे अशा पंचवीस ठिकाणांची तपासणी केली, ती दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. किती कांदा खरेदी केला, निर्यात केला, स्थानिक बाजारपेठेत विकला या संपूर्ण व्यवहारांसह अन्य कागदपत्रांची तपासणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. जिह्यात सिन्नर, मनमाड, नामपूर, नांदगाव येथे कमी प्रमाणात कांदा लिलाव झाले.

आपली प्रतिक्रिया द्या