मोदी सरकारविरुद्ध बोलणाऱया  कलाकार, निर्माता-दिग्दर्शकांवर आयकराच्या धाडी

केंद्रातील मोदी सरकारविरोधात लिहिणाऱया, बोलणाऱया, टीका करणाऱया कलाकार, चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांवर बुधवारी आयकर विभागाने कारवाई केली. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल यांच्या मालमत्तांवर छापे टापून आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. मुंबई आणि पुण्यातील 30 ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या.

अनुराग कश्यप यांनी 2011 मध्ये फॅन्टम फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना करून अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर कश्यप यांनी गुड-बॅड फिल्म्स तर, विक्रमादित्य मोटवाणी यांनी अंदोलन फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. कर चुकवेगिरी प्रकरणात मुंबई आणि पुण्यातील 30 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. सकाळी सुरू झालेले हे धाडसत्र रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

यांच्यावर छापे

अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाणी, निर्माता विकास बहल, निर्माता-वितरण मधु मटेंना, रिलायन्स एण्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ शिभाशिष सरकार, क्वान पंपनीचे काही अधिकारी.

केंद्राविरुद्ध बोलणाऱयांना टार्गेट केले जाते – नवाब मलिक

केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध भूमिका घेणाऱयांना, बोलणाऱयांना टार्गेट केले जात आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास, काwशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

केंद्रीयमंत्री जावडेकरांनी आरोप फेटाळले

भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळले. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्या आधारे कारवाई केली जाते. हे प्रकरण नंतर कोर्टातही जाते, असे जावडेकर म्हणाले.

सरकारच्या धोरणांना विरोध केला म्हणून…

  • शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱया अभिनेत्री तापसी पन्नूने अनेकवेळा मोदी सरकारच्या धोरणाला ट्विटर, फेसबुक या सोशल मिडियातून विरोध केला आहे. पिंक, थप्पड, बदला या चित्रपटात तापसीच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.
  • गँग ऑफ वासेपूर, लुटेरा, अगली, उडता पंजाब, ब्लॅक फ्रायडे, देव-डीसह अनेक सरस चित्रपटांचे दिग्दर्शक-निर्माता असलेले अनुराग कश्यप यांनी अनेकदा मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. सीएए विरुद्ध आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी शाहीनबाग आणि ‘जेएनयू’मध्ये भेट दिली होती. त्यामुळे आयकरने केलेली कारवाई ही सुडबुद्धीने असल्याची चर्चा सोशल मिडियात सुरू आहे.
आपली प्रतिक्रिया द्या