‘बीआयटी’ चाळींच्या वाढीव बिलांना मार्चपर्यंत स्थगिती

रहिवाशांच्या विरोधामुळे मुंबईतील ‘बीआयटी’ चाळींचे वाढलेले भाडे लवकरच कमी होणार असून मार्चपर्यंत भाडेवाढीला दिलेली स्थगिती कायम राहणार आहे. मात्र 40 ते 100 रुपये असणाऱया नाममात्र भाडय़ात सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी सुधारित दर लवकरच निश्चित होणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. या निर्णयामुळे ‘बीआयटी’चाळीत राहणाऱया हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

   मुंबईत माझगाव-ताडवाडी, लव्हलेन, मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा, परळ आदी भागात पालिकेच्या 100 वर्षांपूर्वीच्या बीआयटी चाळी आहेत. या ठिकाणी भाडेकरूंसह पोलीस व पालिका कामगार वास्तव्यास आहेत.  160 ते 200 चौरस फुटांच्या या चाळींकडून पालिका दरमहा 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत भाडे आकारत होती, मात्र सप्टेंबरपासून हे भाडे वाढवून 400 ते 450 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला रहिवाशांनी जोरदार विरोधही केला. या पार्श्वभूमीवर स्पटेंबर 2022 पासून पालिकेकडून हे भाडे घेणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव भाडय़ात कपात करण्यात येणार असून सुधारित दर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

बीडीडीच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याची मागणी

‘म्हाडा’च्या माध्यमातून होणाऱया वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासाच्या धर्तीवर मुंबईतील ‘बीआयटी’ चाळींचा पुनर्विकास करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यामुळे 160 ते 200 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया गोरगरीबांना 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळू शकणार आहे.

याबाबत शिवसेना उपनेते माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना निवेदनही दिले आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

यातील धोकादायक झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र हा धोरणात्मक निर्णय असल्याने राज्य सरकारच्या पातळीवर कार्यवाही झाल्यानंतर पालिकेच्या स्थरावर धोरण निश्चित करून निर्णय होईल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

या ठिकाणी आहेत बीआयटीचाळी

माझगाव, ताडवाडी     16

परळ          6

लव्हलेन      3

चिंचबंदर     7

मांडवी कोळीवाडा      5

मुंबई सेंट्रल 19

आग्रीपाडा  24