यांत्रिकीकरण वाढले, बैलबाजारात मंदीचे सावट

63

सामना ऑनलाईन, संगमेश्वर

कोकणातील शेतकऱ्यांचा शेतीकडे असणारी ओढ कमी होत असल्याने आणि यांत्रिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे कोकणात भरणाऱ्या बैल बाजारात सध्या मंदी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील तुरळ येथे यावर्षीही बैलबाजार भरला आहे. बैलांच्या किमती नॅनो गाडीपेक्षाही महाग असल्याने शेतकऱ्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. यामुळे आपल्या सर्जा-राजाच्या विक्रीसाठी बाजारात आलेले व्यापारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाळापूर्व हंगामात रत्नागिरी जिह्यात तीन ठिकाणी बैलांचा बाजार भरतो. यातील लांजा आणि तुरळ येथील बाजार सर्वात मोठा समजला जातो. संगमेश्वर तालुक्यात तुरळ येथे गुढीपाडव्यानंतर बैलबाजार भरण्याची परंपरा गेली २५ वर्षे सुरू आहे. तालुक्यासह चिपळूण, गुहागर, खेड येथील शेतकरी येथे बैलांच्या खरेदीसाठी हजेरी लावतात.

पूर्वी शेतकऱ्यांना बैल खरेदीसाठी मलकापूर, कोल्हापूर, बांबवडे, कराड, पाटण या ठिकाणी जावे लागत होते. मात्र शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी गेली २५ वर्षे तुरळ येथे महामार्गालगतच हा बाजार भरवला जातो. पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी बैल विक्रीसाठी आणतात. सध्या या बाजारात ३० बैल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यातील बैलांची किंमत ६० हजार ते एक लाख अशी आहे. परिणामी एका बैलजोडीची किंमत लाखात जाते. एका नॅनो गाडीपेक्षाही बैलजोडी महाग झाल्याचे दिसत आहे. सध्या यांत्रिकीकरणामुळे शेतीसाठी बैलांची निकड कमी होत आहे. अशा स्थितीत बाजारात खूपच मंदी आहे. वाढत्या किमतीमुळे शेतकरीही बैलखरेदी करण्यास अनुत्सुक आहेत. पण यापेक्षा अन्य कोणताही पर्याय नसल्याने आम्ही हा व्यवसाय करीत असल्याचे येथे बैलविक्रीसाठी आलेले व्यापारी सीताराम साबळे सांगतात.

या बैलबाजाराविषयी बोलताना जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी गेली २५ वर्षे हा बाजार येथे उघड्यावरच भरतो मात्र यापुढील काळात आपण या बाजारासाठी एक मोठी इमारत उभी करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. यातून पावसाळ्यातही हा बाजार येथे सुरू राहिल असे सांगितले. सध्या बैलबाजारात मंदी असली तरी जसा पावसाळा जवळ येईल तसा बैलांची विक्रीही चांगली होईल असा विश्वास येथील व्यापारी करीत आहेत. सध्या या खिल्लारी बैलांना पाहण्यासाठी शौकीन गर्दी करताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या