… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत

3094

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात उद्या शुक्रवारपासून पहिल्या डे-नाईट कसोटीला सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स मैदानावर हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा संघ विराटच्या नेतृत्वाखाली नवीन अध्यायाला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आणि कसोटी मालिकेत 1-0 असा आघाडीवर असतानाही कर्णधार विराट कोहली चिंतेत आहे.

कोलकातात होणाऱ्या ऐतिहासिक कसोटीपूर्वी विराटने पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपली चिंता बोलून दाखवली. विराट म्हणाला, ‘डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सायंकाळच्या सुमारास मैदानावर पडणारे दव. या गोष्टींचा नेमका अंदाज लावता येत नाही. नेमक्या कोणत्यावेळी दवचा प्रभाव जास्त असेल हे ठामपणे सांगता येत नाही, जशी परिस्थिती असेल तसे खेळत रहावे लागते.’

अधिक सजग राहण्याची आवश्यकता
विराट पुढे म्हणाला की, इडन गार्डन्सची खेळपट्टी आणि पिंक चेंडू हे देखील महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. कारण जे निर्णय घ्यायचे आहेत ते लवकर आणि योग्य घ्यावे लागतील. बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये लवकर येईल, त्यामुळे झेल घेतानाही अधिक सजग रहावे लागणार आहे. तसेच आम्ही सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचेही विराट म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या