#INDvBAN कोलकाता कसोटीत टीम इंडियाने नोंदवले ‘विराट’ विक्रम, वाचा सविस्तर…

1128

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात प्रसिद्ध इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत यजमान संघाने पाहुण्या संघाचा 1 डाव आणि 46 धावांनी दणदणीत पराभव केला. कोलकाता कसोटी जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. ‘पिंक बॉल’ने खेळलेल्या गेलेल्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि गोलंदाजांच्या धारधार आक्रमणापुढे पाहुण्या बांगलादेश संघाने तिसऱ्याच दिवशी लोटांगण घातले. या विजयासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व पिंक बॉल कसोटीमध्ये निकाल लागण्याची परंपरा कायम राखली गेली. यासह टीम इंडियाने या कसोटीमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली.

सलग 12 वा कसोटी मालिका विजय

team-india
टीम इंडियाने घरच्या मैदानावरील आपला विजयाचा वारू कायम राखत सलग 12 कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 3-0 असा विजय मिळवला तेव्हाच विश्वविक्रम झाला होता, आता बांगलादेशचा पराभव करत टीम इंडियाने आपला हा विक्रम आणखी मजबूत केला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने दोनदा सलग 10-10 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम नोंदवला होता.

सलग 7 कसोटी जिंकण्याचा विक्रम

team-india2
टीम इंडियाने सलग 7 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम नोंदवला आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2013 मध्ये टीम इंडियाने सलग 6 कसोटी जिंकले होते, आता हा विक्रम टीम इंडियाने मोडला आहे.

26 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

team-india1
विराटसेनेने सलग चार कसोटीमध्ये डावाने विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. टीम इंडियाने पुणे, रांची, इंदूर आणि कोलकाता कसोटीमध्ये डावाने विजय मिळवला. पुणे कसोटीत एक डाव आणि 137 धावांनी, रांची कसोटीत एक डाव आणि 202 धावांनी, इंदूर कसोटीत एक डाव आणि 130 धावांनी आणि कोलकाता कसोटीत एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. याआधी 1992-93 आणि 1993-94 ध्ये टीम इंडियाने सलग तीन कसोटीत डावाने विजय मिळवला होता. 26 वर्षापूर्वीचा हा विक्रम टीम इंडियाने मोडला आहे.

‘विराट’ विक्रम

virat
टीम इंडियासह विराट कोहलीने देखील अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोलकाता कसोटीत विराटने कसोटी कारकीर्दीतील 27 वे शतक ठोकले. ऐतिहासिक पिंक कसोटीमध्ये शतक ठोकणारा विराट हिंदुस्थानचा पहिला फलंदाज ठरला आहे. कर्णधारपदावर असताना शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचा विक्रम मोडला आहे. विराटच्या नावावर कर्णधार असताना 20 कसोटी शतकांची नोंद झाली आहे, तर पॉण्टिंगच्या नावावर 19 शतकांची नोद आहे. या यादीत आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ 25 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

यासह विराट कोहलीने कर्णधार पदावर असताना टीम इंडियाला 11 व्यांदा डावाने विजय मिळवून दिला आहे. या बाबतीत विराटने धोनीचा विक्रम मोडला आहे. धोनीच्या नावावर 9 वेळा डावाने विजय मिळवून देण्याचा विक्रम होता. आता या यादीत विराट कोहली 11 कसोटी विजयासह पहिल्या, धोनी 9 कसोटी विजयासह दुसऱ्या, अझरुद्दीने 8 कसोटी विजयासह तिसऱ्या आणि गांगुली 7 कसोटी विजयासह चौथ्या स्थानावर आहे.

सचिनच्या विक्रमाची बरोबरी

virat1
विराट कोहलीने कोलकाता कसोटीत शतक ठोकताच सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सर्वात कमी डावात 27 शतक ठोकण्याच्या सचिनच्या विक्रमाची विराटने बरोबरी केली आहे. विराटने 141 व्या डावात 27 वे शतक ठोकले. या यादीत डॉन ब्रॅडमन पहिल्या स्थानावर असून त्यांनी 70 जावात 27 कसोटी शतकांचा टप्पा गाठला होता.

टीम इंडियाकडून पहिले शतक ठोकणारे खेळाडू –

कसोटी – लाला अमरनाथ (1933-34)
डे-नाईट कसोटी – विराट कोहली (2019-20)
वन डे – कपिल देव (1983)
डे-नाईट वन डे – संजय मांजरेकर (1991)
टी-20 – सुरेश रैना (2010)
डे-नाईट टी-20 – रोहित शर्मा (2015)

आपली प्रतिक्रिया द्या