अय्यरच्या शतकावर टेलरने फिरवले पाणी, न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला पराभव

815

टी-20 मालिकेमध्ये 5-0 असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडियाला एक दिवसीय मालिकेच्या पहिल्या लढतीत यजमान न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाला 4 विकेट्सने पराभव करत हॅमिल्टनमध्ये झालेला पहिला सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून रॉस टेलर याने शतकी खेळी करत संघाला या दौऱ्यातील पहिला विजय दाखवला.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 347 धावांचा पाठलाग करताना गप्टिल आणि निकोल्सने 86 धावांची सलामी दिली. शार्दुल ठाकूरने गप्टिलला 32 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. यानंतर कुलदीपने ब्लंडेलाल 9 धावांवर बाद करून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. निकोल्सही अर्धशतकानंतर विराटच्या थ्रोवर धावबाद झाला. त्याने 78 धावांची खेळी केली.

तीन खेळाडू बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथमने मोर्चा सांभाळा आणि शतकी भागिदारी केली. लॅथमने 48 चेंडूत 69 धावा चोपत संघाला विजयाचे द्वार उघडून दिले. रॉस टेलरने अखेरपर्यंत नाबाद राहात संघाला विजयी केले. टेलरने 84 चेंडूत 109 धावांची खेळी केली आणि संघाला 11 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांमध्ये 347 धावा चोपल्या. या लढतीमध्ये पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल ही नवी जोडी सलामीली उतरली. दोघांनी टीम इंडियाला 50 धावांची सलामी दिली. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर खराब शॉट खेळून दोघेही बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी भागिदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडू आगेकूच केले. अर्धशतकानंतर विराट 51 धावांवर बाद झाला. दुसरीकडे अय्यरने एक दिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर तो देखील 103 धावांवर बाद झाला. लोकेश राहुलने पाचव्या स्थानावर फलं दाजी करताना 64 चेंडूत आक्रमक 88 धावांची खेळी केली, तर जाधवने अखेरच्या षटकांमध्ये 15 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या