#INDvNZ न्यूझीलंडमध्ये विजयाचा ‘तिरंगा’ फडकला, ऑकलंडमध्ये हिंदुस्थानची हॅटट्रीक

प्रजासत्ताकदिनी झालेल्या टी-20 लढतीत टीम इंडियाने यजमान न्यूझीलंडचा 7 विकेट्सने दणदणीत पराभव केला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 133 धावांचे आव्हान टीम इंडियाने तीन गडी आणि 15 चेंडू राखून पूर्ण केले. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑकलंडमध्ये टीम इंडियाने विजयाची हॅटट्रीकही पूर्ण केली आहे.

ऑकलंडमध्ये यापूर्वी टीम इंडियाने दोन लढती खेळल्या होत्या आणि दोन्ही लढतीत विजय मिळवसला होता. या मैदानावर टीम इंडियाने 2019 ला पहिला सामना खेळला होता. तेव्हा टीम इंडियाने यजमान संघाचा 7 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर 24 जानेवारी, 2020 ला दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना देखील टीम इंडियाने 6 विकेट्सने जिंकला होता. आता 26 जानेवारी, 2020 ला झालेला सामना जिंकत टीम इंडियाने या मैदानावर विजयाची हॅटट्रीक साध्य केली आहे.

राहुल-श्रेयसची दमदार फलंदाजी
टीम इंडियापुढे 133 धावांचे आव्हान होते. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही 11 धावांवर बाद झाल्याने सामना रंगतदार होईल असे वाटले. मात्र लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत सामना एकतर्फी केला. श्रेयस अय्यर अर्धशतकाजवळ आला असताना 44 धावांवर बाद झाला. राहुलने अखेरपर्यंत 57 धावांवर नाबाद राहात टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

गोलंदाजांचा टिच्चून मारा
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या न्यूझीलंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेसण घातले. पहिला लढतीत 200 धावा चोपणारे न्यूझीलंडचे फलंदाज या लढतीत धावांसाठी संघर्ष करताना दिसले. न्यूझीलंडने 20 षटकांमध्ये 132 धावा केल्या. मार्टन गुप्टील आणि टीम सिफर्टने प्रत्येकी 33 धावा केल्या. टीम इंडियाकडून रविंद्र जाडेजाने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या