न्यूझीलंडने टी-20 मालिकेतील पराभवाचे उट्टे काढले, वन डे मालिकेत हिंदुस्थानला ‘व्हाईटवॉश’

13311

टी-20 मालिका 5-0 अशी गमावल्यानंतर यजमान न्यूझीलंडने पाहुण्या हिंदुस्थानचा एक दिवसीय मालिकेमध्ये दारुण पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवत न्यूझीलंडने टी-20 मालिकेतील पराभवाचे उट्टे काढले आहे. मंगळवारी झालेल्या अखेरच्या एकदिवसीय लढतीत न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि हिंदुस्थानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.

टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 297 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्स यांनी 100 धावांची सलामी दिली. अर्धशतकानंतर गप्टिल 66 आणि हेन्री निकोल्स 80 धावांवर बाद झाल. यानंतर कर्णधार केन विलियम्सन 22, रॉस टेलर 12 आणि जेमी निशम 19 धावा काढून बाद झाले. यानंतर कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम लेथम याने अखेरपर्यंत मैदानावर शड्डू ठोकून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. ग्रँडहोमने 28 चेंडूत नाबाद 59 आणि टॉम लेथमने 32 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

तत्पूर्वी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 7 बाद 296 धावा केल्या. सलामीला आलेला मयांक अग्रवाल 1 आणि विराट कोहली 9 धावांवर बाद झाल्यानंतर पृथ्वी आणि अय्यरमध्ये छोटी पण डाव सावरणारी भागिदारी झाली. पृथ्वी 40 धावांवर, तर अय्यर अर्धशतकानंतर 62 धावांवर बाद झाला. पाचव्या स्थानावर उतरलेल्या के.एल. राहुलने पुन्हा एकदा शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले. राहुलने 113 चेंडूत 112 धावांची शतकी खेळी केली. मनिष पांडने 42 धावा केल्या. न्यूझीलंडकडून बेनेटने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर निशम, जेमीसनने प्रत्येक 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या