हिंदुस्थानकडून आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा, पहिल्यात लढतीत पुनिया ‘वुमन ऑफ दी मॅच’ ठरली

382

आपली पहिली वन डे खेळणाऱ्या प्रिया पुनिया हिने बुधवारी नाबाद 75 धावांची खेळी साकारत हिंदुस्थानच्या महिला संघाला धडाकेबाज विजय मिळवून दिला. हिंदुस्थानने येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी व 50 चेंडू राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रिया पुनियाची ‘वुमन ऑफ दी मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 165 धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थानने अवघे 2 गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. प्रिया पुनिया व जेमिमा रॉड्रिग्स या सलामी जोडीने 83 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या विजयाची पायाभरणी केली. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्स हिने 65 चेंडूंत 7 चौकारांसह 55 धावांची खेळी साकारली. नॉनदुमिसो शँगेस हिला तिला बाद केले. त्यानंतर आलेल्या पूनम राऊत (16 धावा) मोठी खेळी करता आली नाही, मात्र त्यानंतर प्रिया पुनियाने कर्णधार मिताली राजच्या (नाबाद 11 धावा) साथीने हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रिया पुनियाने 8 चौकारांसह नाबाद 75 धावा तडकावल्या.

मितालीच्या शिरपेचात मानाचा तुरा

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या शिरपेचात बुधवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 20 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 26 जून 1999 साली ती पहिला वन डे सामना खेळली होती. तिथपासून आतापर्यंत तिने 204 वन डे, 10 कसोटी व 89 ट्वेण्टी-20 सामन्यांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. सचिन तेंडुलकरची वन डे कारकीर्द 22 वर्षे आणि 91 दिवस इतकी ठरलीय. पुरुषांच्या गटात तोच सर्वोत्तम आहे. त्यानंतर सनथ जयसूर्या व जावेद मियाँदाद यांचा नंबर लागतो. मिताली राज एकूण चौथ्या क्रमांकावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या