ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची पुन्हा हुल्लडबाजी; सिराज, सुंदरला उद्देशून आक्षेपार्ह शब्द काढले

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाहीए. सिडनी कसोटी जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना उद्देशून वर्णद्वेषी शेरेबाजी केल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत अशा प्रकारची कोणतीही घटना घडणार नाही असे आश्वासन क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आले होते. पण ब्रिस्बेनच्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून पुन्हा शेरेबाजी, अपशब्द वापरण्यात आले. ही खेदजनक घटना.

सिडनी कसोटीनंतर ब्रिस्बेन कसोटीतही मोहम्मद सिराजलाच प्रेक्षकांकडून टार्गेट करण्यात आले. मोहम्मद सिराज व वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंना ‘ग्रब’ म्हणजेच ‘किडा’ असे संबोधण्यात आले. सीमारेषेनजीक क्षेत्ररक्षण करीत असलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंची प्रेक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या गैरवर्तणुकीचा हा व्हिडीओ समोर आला आहे, मात्र हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाकडून याबाबत अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

तिसऱ्या कसोटीप्रमाणेच घडले

ऑस्ट्रेलियातील स्थानिक वर्तमानपत्रामधून हे वृत्त पुढे आले आहे. सीमारेषेनजीक क्षेत्ररक्षण करणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंना यावेळी टार्गेट करण्यात आले होते. सिडनी कसोटीप्रमाणेच ब्रिस्बेन कसोटीमध्ये घडले. सुरुवातीला प्रेक्षक गाणी म्हणत होते. त्यानंतर मोहम्मद सिराजला उद्देशून अपशब्द वापरण्यात आले.

आश्वासनानंतरही

सिडनी कसोटीतील घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानची माफी मागितली होती. अशा प्रकारची घटना यापुढे खपवून घेणार नाही. याविरोधात कडक पाऊल उचलण्यात येईल अशी भूमिकाही त्यांच्याकडून घेण्यात आली होती. पण सलग दुसऱ्या कसोटीत पुन्हा तेच पाहायला मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या