विराटसेना टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये, इंग्लंडविरुद्ध 3-1 ने मालिका विजय

अहमदाबाद येथील अंतिम कसोटी सामना टीम इंडियाने 1 डाव आणि 25 धावांनी जिंकला. या कसोटीसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आणि कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर हा सामना रंगणार आहे.

चौथ्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांमध्ये गुंडाळला. इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा फिरकीमध्ये अडकला आणि त्यांचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. इंग्लंडकडून लॉरेन्सने सर्वाधिक 50 तर कर्णधार जो रूटने 30 धावा  केल्या. टीम इंडियाकडून फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 5 बळी घेतले.

सुंदर-अक्षरची शतकी भागिदारी

तत्पूर्वी टीम इंडियाने आपला पहिला डाव सकाळी 7 बाद 294 धावांवरून पुढे सुरू केला. सकाळच्या सत्रामध्ये अक्षर पटेल आणि वाशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा धिराने सामना केला. दोघांमध्ये 100 धावांची भागिदारी झाली. परंतु अक्षर पटेलला अति घाई नडली आणि तो 43 धावांवर धावबाद झाला. त्यावेळी वाशिंग्टन सुंदर 96 धावांवर नाबाद होता.

सुंदरचे शतक हुकले

काल 60 धावांवर नाबाद असलेला सुंदर सकाळपासून आत्मविश्वासाने खेळत होता. मात्र अक्षर पटेल धावबाद झाल्यानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला स्टोक्सने एकाच षटकात शून्यावर बाद केले. त्यावेळी नॉन स्ट्राईकला असणारा सुंदर 96 धावांवर खेळत होता. 5 चेंडूत 3 खेळाडू बाद झाल्याने त्याला स्ट्राईकही मिळाली नाही. त्यामुळे त्याचे पहिले कसोटी शतक हुकले.

मालिकेत पिछाडीवर असताना विजय

दरम्यान, टीम इंडियाने या कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्यानंतर झालेल्या तिन्ही लढतीत यजमान संघाने पाहुण्यांचे वस्त्रहरण केले. पहिला सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याची टीम इंडियाची ही सहावी वेळ आहे. याआधी 1972-73 ला इंग्लंडविरुद्ध 2-1, 2000-01 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1, 2015 ला श्रीलंकेविरुद्ध 2-1, 2016-17 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1, 2020-21 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला आहे.

धावफलक

इंग्लंड – पहिला डाव 205 आणि दुसरा डाव 135
हिंदुस्थान – पहिला डाव 365

आपली प्रतिक्रिया द्या