खेळता येईना अंगण वाकडे! इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांमध्येच आटोपला

अहमदाबाद येथे पार पडलेल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडच्या संघाला दोन दिवसांच्या आतच पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले. मात्र गुरुवारपासून अहमदाबादमध्येच सुरू झालेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 205 धावांमध्येच आटोपला. अहमदाबादमधील ठणठणीत खेळपट्टीवर जो रूटचा संघ गडगडला.

अक्षर पटेल (4 बळी), रविचंद्रन अश्विन (3 बळी), मोहम्मद सिराज (2 बळी) व वॉशिंग्टन सुंदर (1 बळी) या हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत पाहुण्यांचा डाव संपुष्टात आणला. तिसऱ्या कसोटीतील पराभवाला खेळपट्टीला जबाबदार धरणाऱ्या इंग्लंडची चौथ्या कसोटीतील पहिल्या डावातील अवस्था पाहून ‘खेळता येईन अंगण वाकडे’ असेच म्हणावेसे वाटते. हिंदुस्थानी संघाने पहिल्या दिवसअखेरीस 1 बाद 24 धावा केल्या असून आता टीम इंडियाचा संघ 181 धावांनी पिछाडीवर आहे.

तीन फलंदाज झटपट बाद

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या पाटा खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांना याचा फायदा घेता आला नाही. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर डॉम सिबली अवघ्या 2 धावांवरच त्रिफळीचीत झाला. यावेळी चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन यष्टय़ांवर आदळला. त्यानंतर अक्षर पटेलला पुढे जाऊन मारण्याच्या नादात झॅक क्राऊली 9 धावांवर मोहम्मद सिराजकरवी झेलबाद झाला. मोहम्मद सिराजच्या झपकन आत येणाऱ्या चेंडूवर कर्णधार जो रूटने विकेट गमावला. त्याला फक्त पाचच धावा करता आल्या. यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 30 धावा अशी झाली.

… अन् बेअरस्टो पायचीत बाद

जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स या जोडीने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 48 धावांची भागीदारी रचली. पण यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो पायचीत बाद झाला. त्याने 28 धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार मारले. जॉनी बेअरस्टोने पंचांकडे ‘रिह्यू’ मागितला. रिप्ले बघितले असता चेंडू स्टम्पच्या वरच्या बाजूला लागत होता हे दिसून आले. अंपायर कॉल म्हणजेच पंचांकडून बाद देण्यात आल्यामुळे तिसऱ्या पंचांनाही त्याला बाद द्यावे लागले. अंपायर कॉल ‘नाबाद’ असता तर जॉनी बेअरस्टोला तिसऱ्या पंचांनीही नाबाद दिले असते.

सुंदरचा अफलातून चेंडू अन् स्टोक्स बाद

बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी एका बाजूने संयमी फलंदाजी करीत किल्ला लढवला. त्याने कसोटीतील 24 वे अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने 121 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार व 6 चौकार मारले. ओली पोपसोबत त्याची जोडी जमली असतानाच वॉशिंग्टन सुंदरच्या झपकन आत येणाऱ्या चेंडूवर तो पायचीत झाला. अराऊंड द विकेट गोलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने नैसर्गिक ऑफस्पिन न करता चेंडू वेगाने आत आणला. येथेच स्टोक्स फसला.

धावफलकइंग्लंड पहिला डाव झॅक क्राऊली झे. सिराज गो. अक्षर 9, सिबली त्रि. गो. अक्षर 2, बेअरस्टो पायचीत गो. अक्षर 28, रूट पायचीत गो. सिराज 5, स्टोक्स पायचीत गो. स्टोक्स 55, पोप झे. गिल गो. अश्विन 29, लॉरेन्स यष्टिचीत पंत गो. अक्षर 46, पह्क्स झे. रहाणे गो. अश्विन 1, बेस पायचीत गो. अक्षर 3, लीच पायचीत गो. अश्विन 7, अॅण्डरसन नाबाद 10, अवांतर 10. एपूण 75.5 षटकांत सर्व बाद 205 धावा. बाद क्रम – 1-10, 2-15, 3-30, 4-78, 5-121, 6-166, 7-170, 8-188, 9-189, 10-205. गोलंदाजी इशांत 9-2-23-0, सिराज 14-2-45-2, अक्षर 26-7-68-4, अश्विन 19.5-4-47-3, सुंदर 7-1-14-1. हिंदुस्थान पहिला डाव गिल पायचीत गो. अॅण्डरसन 0, रोहित खेळत आहे 8, पुजारा खेळत आहे 15, अवांतर ः 1. एपूण ः 12 षटकांत 1 बाद 24 धावा. गोलंदाजी अॅण्डरसन 5-5-0-1, स्टोक्स 2-1-4-0, लीच 4-0-16-0, बेस 1-0-4-0.

आपली प्रतिक्रिया द्या