न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम टी-२० सामन्यावर वरुणराजाचे सावट

सामना ऑनलाईन । तिरुअनंतपुरम

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना ७ नोव्हेंबरला तिरुअनंतरपुरम येथे होणार आहे. या सामन्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तिरुअनंतरपुरममध्ये ५-८ नोव्हेंबर या कालावधीत पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

केरळ क्रिकेट संघाचे चिटणीस जयेश जॉर्ज यांनी सांगितले की, मैदानातील पाणी निचरा होण्यासाठीची व्यवस्था उत्तम आहे. सामन्यादरम्यान पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यास १० मिनिटामध्ये मैदान खेळण्यायोग्य होईल, असे जॉर्ज यांनी सांगितले.

केरळच्या राजधानीला तब्बल ३० वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. याआधी १९८८मध्ये वेस्ट इंडिजचा संघ व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानविरूद्ध मैदानात उतरला होता. तसेच २०१५मध्ये आयोजित राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन आणि समारोप या मैदानावर झाला होता. मैदानावर सामना पाहण्यासाठी एकाच वेळी तब्बल ५० हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दिल्लीमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात हिंदुस्थानने ५३ धावांनी विजय मिळवला होता. तर, राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात किवी संघाने यजमान संघाचा ४० धावांनी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळव्यात मालिका विजयाचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसतील.