बांगलादेशला चारीमुंड्या चित केल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडला धुळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे. बंगळुरुमध्ये 16 ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र सामन्यावर पावसाचे सावट असून सामन्याचा पहिला दिवस पाण्यात जाण्याची शक्यता आहे. अशातच टीम इंडियाचा स्टार फलंदाज दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बंगळुरूमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फॉर्मात असणारा टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यात आहे. जर शुभमन गिल पहिल्या सामन्यात खेळला नाही, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण उतरणार? हा मोठा प्रश्न टीम इंडियासमोर निर्माण होऊ शकतो. शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत चेन्नई कसोटीमध्ये नाबाद 119 धावा केल्या होत्या. टीम इंडियाच्या विजयात त्याच्या या खेळीचा खारीचा वाटा होता.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. पहिला सामना उद्या (16 ऑक्टोबर) पासून बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. दुसरा सामना पुण्यामध्ये 24 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.