दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी; कोहली, अश्विन, शमीला विक्रमांचा खास मौका

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे होणार आहे. या मालिकेत हिंदुस्थान 3 कसोटी सामने खेळणार आहे. या कसोटी सामन्यादरम्यान हिंदुस्थानी संघाचे खेळाडू अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतात. सर्वात आधी अश्विनला कपिल देवचा विक्रम मोडण्याची संधी असेल, तर कोहलीला स्वतःचे प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम मोडणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही आपल्या नावावर मोठी कामगिरी करेल.

अश्विनला इतिहास रचण्याची संधी आहे

सर्वप्रथम अश्विनबद्दल बोलूया, हिंदुस्थानचा फिरकी गोलंदाज अश्विनला कपिल देवसारख्या दिग्गजाचा विक्रम मोडण्याची संधी आहे. अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 427 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर महान अष्टपैलू कपिल देवने आपल्या कसोटी कारकिर्दीत 434 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. आता जर अश्विन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान 8 विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर कपिलचा हा विक्रम मोडेल. असे केल्याने अश्विन हिंदुस्थानकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. हिंदुस्थानकडून कसोटीत अनिल कुंबळेच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. कुंबळेने 619 विकेट घेतल्या आहेत.

मोहम्मद शमी विकेटचे ‘दुहेरी शतक’ पूर्ण करू शकतो

कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीने आतापर्यंत 54 कसोटीत 195 बळी घेतले आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान शमीला विकेटचे द्विशतक झळकावण्याची संधी असेल. शमीने 5 विकेट घेताच कसोटीत 200 विकेट्स पूर्ण करू होतील. असे केल्याने शमी कसोटीत 200 बळी घेणारा हिंदुस्थानचा पाचवा वेगवान गोलंदाज ठरेल. आतापर्यंत फक्त कपिल देव, झहीर खान, इशांत शर्मा आणि जवागल श्रीनाथ या हिंदुस्थान वेगवान गोलंदाजांनी कसोटीत 200 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.

कोहलीला संधी

राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीला असेल. कोहलीने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत 5 कसोटी सामने खेळले असून या कालावधीत त्याने एकूण 558 धावा केल्या आहेत. हिंदुस्थानकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणारा कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या पुढे द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने दक्षिण आफ्रिकेत 624 धावा केल्या आहेत. तर तिथे लक्ष्मणने 566 धावा केल्या आहेत. कोहलीला द्रविड आणि लक्ष्मणला पराभूत करण्याची संधी असेल. कोहलीने ६७ धावा केल्या तर तो द्रविड आणि लक्ष्मणला मागे टाकेल.

कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान इतिहास रचू शकेल का?

आतापर्यंत हिंदुस्थानचा संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. अशा स्थितीत कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ यावेळी नवा इतिहास रचू शकेल का? तसे पाहता यंदा हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत करून नवा पराक्रम केला आहे. अशा परिस्थितीत कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान कसोटी मालिका जिंकून नवा अध्याय सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.