हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका आजपासून, विश्वचषकापूर्वी सरावासाठी अखेरची संधी!

आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेचे वेळापत्रक बनविले होते. त्यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने 2-1 फरकाने बाजी मारली. आता उद्या, 28 सप्टेंबरपासून थिरूवनंतपुरममध्ये हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या मालिकेला सुरुवात होत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सरावाच्या दृष्टीने या मालिकेला महत्त्व आहे.

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली असली तरी आपल्या गोलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली हे विसरून चालणार नाही. फिरकीपटू अक्षर पटेल सोडल्यास सर्वच गोलंदाजांनी निराशा केली. अनुभवी भुवनेश्वर कुमार महागडा गोलंदाज ठरला, तर पुनरागमन करणारे जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव या फलंदाजांचा परतलेला फॉर्म टीम इंडियासाठी नक्कीच दिलासा देणारा ठरला. हार्दिक पांडय़ाने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली असून कर्णधार रोहित गोलंदाजीत त्याला जपून वापरताना दिसतोय. मात्र हार्दिकसह भुवनेश्वर कुमारला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अर्शदीप सिंग व दीपक चहरचे पुनरागमन झाले आहे. मोहम्मद शमी कोविडमधून बरा झालेला नसल्यामुळे दीपक हुड्डाही अनफिट असल्याने या दोघांना वगळण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे पाहुण्या संघाचा विजयरथ रोखण्याचे आव्हान रोहित शर्माच्या सेनेपुढे असेल. अलीकडे दक्षिण आफ्रिकेने लागोपाठ विजय मिळविल्यामुळे या संघाचे मनोबल उंचावलेले आहे. त्यांच्याकडे कर्णधार तेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन असे मॅचविनर फलंदाज आहेत. कॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्खिया व तबरेज शम्सी अशी जबरदस्त गोलंदाजीही दक्षिण आफ्रिकेच्या दिमतीला आहे. हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिकेदरम्यान मागील दोन मालिका बरोबरीत सुटल्या होत्या. त्यामुळे उभय संघांमधील या टी-20 मालिकेकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

उभय संघ

हिंदुस्थानी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका संघ – तेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्केरम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्खिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसेन, तबरेज शम्सी.

हिंदुस्थान  विरुद्ध दक्षिण  आफ्रिका, टी-20 मालिका

पहिला टी-20 सामना – 28 सप्टेंबर, 7 वाजता (थिरूवनंतपुरम)

दुसरा टी-20 सामना – 2 ऑक्टोबर, 7 वाजता (गुवाहाटी)

तिसरा टी-20 सामना – 4 ऑक्टोबर, 7 वाजता (इंदूर)

हिंदुस्थान  विरुद्ध दक्षिण आफ्रिका, एकदिवसीय मालिका

पहिली वन डे ः 6 ऑक्टोबर, लखनौ, दुपारी 1.30 वाजता

दुसरी वन डे ः 9 ऑक्टोबर, रांची, दुपारी 1.30 वाजता

तिसरी वन डे ः 11 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 1.30 वाजता