वॉडरर्सच्या मैदानावर इतिहास रचण्यासाठी विराट सेना सज्ज

फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन । जोहान्सबर्ग

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघातील चौथा एकदिवसीय सामना जोहान्सबर्गच्या वॉडरर्सच्या मैदानावर रंगणार आहे. हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने पहिले तीन सामने जिंकत ३-० अशी आघाडी घेतली असून आफ्रिकेत द्विपक्षीय मालिकेत पहिल्यांदाच विजय मिळवण्यासाठी हिंदुस्थानचा संघ उत्सुक आहे.

हिंदुस्थानच्या संघात एक बदल करण्यात आला असून केदार जाधवच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळाले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये धडाकेबाज फलंदाज ए.बी. डीव्हीलिअर्सचे पुनरागमन झाले आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यात डीव्हीलिअर्स खेळू शकला नाही.

या खेळाडूंवर असणार मदार
हिंदुस्थानने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव केला. या तिन्ही सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव व युजवेंद्र चहलने दमदार कामगिरी केली आहे. विराटने पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले आहे. डरबनमध्ये ११२ धावा आणि केपटाऊनमध्ये तिसऱ्या सामन्यात नाबाद १६० धावा केल्या होत्या. या तिन्ही सामन्यात चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने ३० पैकी २१ बळी घेतले आहेत.

इतिहास रचणार
हिंदुस्थानी संघाने एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना २०१०-११ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग दोन सामने जिंकत २-१ अशी आघाडी घेतली मात्र त्यानंतर दोन्ही सामने गमावल्याने २-३ अशा फरकाने मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे चौथा सामना जिंकत कर्णधार विराट अँड कंपनीकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

हिंदुस्थानी संघ –

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) अजिंक्य रहाणे, एम.एस. धोनी, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिकन संघ –
हाशिम आमला, एडम मार्क्रम (कर्णधार), जे.पी. ड्यूमिनी, ए.बी. डीव्हीलिअर्स, हाइनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, क्रिस मॉरिस, अँडीला प्हलुखवेओ कागीसो रबाडा, लुंगिसानी निगडी, मॉर्ने मॉर्केल.

आपली प्रतिक्रिया द्या