कटकमध्ये रंगणार टी-२०चा थरार

सामना ऑनलाईन । कटक

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये बुधवारपासून टी-२०चा थरार सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली कसोटी मालिका १-० आणि प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. आता पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्त्वाखाली हिंदुस्थानचा संघ बुधवारी कटकमध्ये टी-२० सामन्यासाठी संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होणार आहे.

श्रीलंका संघाविरुद्ध टी-२०मध्ये खेळताना हिंदुस्थानी संघाची आकडेवारी आश्वासक आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या ११ टी-२० सामन्यांमध्ये हिंदुस्थान ७ वेळा विजयी, तर ४ सामन्यांत पराभूत झाला आहे. मात्र कटकच्या मैदानावर २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकमेव टी-२० सामन्यात हिंदुस्थानला ६ विकेटनं पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात हिंदुस्तानने प्रथम फलंदाजी करताना फक्त ९२ धावा केल्या होत्या.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लंकेचा पराभव केल्याने आत्मविश्वास उंचावलेले हिंदुस्थानी खेळाडू टी-२०मध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांच्यावर फलंदाजीचा भार असणार आहे. तर, गोलंदाजीत पुनरागमाचा सामना खेळणारा जयदेव उनादकट, प्रथमच संधी मिळालेले बासिल थम्पी, वाशिंग्टन सुंदर आणि दीपक हुड्डा या नवख्या गोलंदाजांवर लंकेच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी आहे.

एकदिवसीय मालिकेत श्रीलंका संघाने शानदार सुरुवात केली होती. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात लंकेने हिंदुस्थानचा पराभव केला होता, मात्र त्यानंतर मोहाली आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यांत लंकेच्या फलंदाजांनी हिंदुस्थानच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकली होती. त्यामुळे लंकेला २-१ अशा फरकाने मालिका गमवावी लागली होती. परंतु लंकेचा थरंगा, मॅथ्यूज आणि डिकवेला शानदार फॉर्ममध्ये असल्याने हिंदुस्थानी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

हिंदुस्थानचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, एम.एस. धोनी, हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदिप यादव, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी, जयदेव उनादकट.

श्रीलंकेचा संघ –
थिसारा परेरा (कर्णधार), उपूल थरंगा, अॅजेलो मॅथ्यूज, कुशाल परेरा, धनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका, चतुरंगा डिसिल्वा, सचित पतिराना, धनंजय डिसिल्वा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामीरा.