
चमकदार कामगिरी करूनदेखील सलामीवीर अभिषेक शर्मा याला श्रीलंकाविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत, तर यष्टिरक्षक संजू सॅमसन याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. निवड समितीच्या या निर्णयाबद्दल काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘श्रीलंका दौऱयासाठी टीम इंडियाची निवड ही मनोरंजनात्मक आहे,’ अशा शब्दांत थरूर यांनी खडे बोल सुनावले आहेत.
टी-20 विश्वचषक विजयानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेत टीम इंडियाने 4-1ने विजय मिळविला. झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने शतक झळकवून सर्वांचे लक्ष आपल्या खेळीकडे वेधून घेतले होते. तर, गोलंदाजीत मुकेश कुमार, आवेश खान यांनी प्रभावी मारा केला. टीम इंडिया आता श्रीलंकाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टी-20, एकदिवसीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र, शतक झळकवणाऱया खेळाडूंना संधी न दिल्याने निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीलंका मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ
टी-20 ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
एकदिवसीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रियान पराग, ऋषभ पंत, के. एल. राहुल, हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.