इंदापूरमधील निमगाव केतकी गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

‘माझा वॉर्ड, माझी जबाबदारी’ अशी घोषणा करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीने राबविलेली मोहीम यशस्वी होताना दिसत आहे. कोरोनाविषयी जनजागृती आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालक केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात ग्रामस्थांना यश आले असून निमगाव केतकी हे गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.

पुणे जिह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गाव विडय़ांच्या पानाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जुलै 2020 मध्ये रुग्ण आढळून आला. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी ‘माझा वॉर्ड, माझी जबाबदारी’ अशी घोषणा करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारी घेऊन गावामध्ये काम सुरू केले. गावातील व्यापारी, दुकानदार यांची ग्रामस्तरीय समिती सोबत बैठक घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश येताना दिसत आहे.
गावामध्ये घंटागाडीद्वारे वाडी-वस्तीवर तसेच गावातील सर्व मंदिरातील लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक व स्वयंसेवक यांच्यामार्फत गृहभेटीद्वारे जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर 48 टीम तयार करुन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

गावातच 50 बेडचे कोविड केअर सेंटर

कोरोनाबाधित रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी निमगाव केतकीमध्ये 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत मास्क, हॅण्डवॉशचे वाटप. गावामध्ये आठवडय़ातून एकदा सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या