पंढरपुरात सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत सत्याग्रह आंदोलन

पंढरपूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मालकीहक्काची घरे मिळावीत, यासह विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून नगरपालिकेसमोर बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता.

नवीन कामगारभरती, सानुग्रह अनुदान मिळावे, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, आरोग्य विमा उतरावा आदी मागण्या सफाई कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

सफाई कामगारांच्या प्रश्नांची दखल घेऊन 9 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन विधानपरिषद सभापती नीलम गोऱहे यांनी विधान भावनात बैठक घेतली होती. या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊनही शासनाने अजून मागण्या मान्य केलेल्या नाहीत. 2 मे रोजी उपायुक्त शंकर गोरे व अनिल मुळे यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. तरीदेखील मागण्या मान्य न झाल्याने कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

या आंदोलनात काशिनाथ सोलंकी, किसन लल्लू, माधव लाला, विठ्ठल रामा, महेश गोयल, गंगाराम पुरबिया, अनिल गोयल, मदन परमार, प्रमोद वाघेला, सतीश सोलंकी, योगेश मेहडा, दाऊत वाघेला, रवि वाघेला, कांतीलाल मेहडा, कल्पेश गोयल, रमेश सोलंकी, राजू वाघेला, रोनक गोयल, अरविंद वाघेला, सुनील मेहडा, राजन गोयल आदी सहभागी झाले आहेत.