स्वातंत्र्यदिनी घडणार या घडामोडी, संपूर्ण देशाचे असेल लक्ष

2097

गुरुवारी हिंदुस्थानचा 73 वा स्वातंत्र्यदिन आहे. या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान मोदी 2019 निवडणुकीतील तुफानी विजयानंतर आणि पुन्हा सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशाला पहिल्यांदाच  लाल किल्ल्यावरून संबोधित करणार आहेत. याशिवाय गुरुवारी काय महत्वाच्या घडामोडी आहेत ते पाहूयात.

73 वा स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्ट रोजी हा हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिन. याच दिवशी हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला होता. गुरुवारी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला 73 वर्ष पूर्ण होत असून देशाची अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू होत आहे.

पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींचे पहिले भाषण

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला 303 जागा मिळाल्या. 2014 पेक्षाही हा मोठा विजय आहे. त्यानंतर पहिल्यांदा मोदी लाल किल्ल्यावरून हिंदुस्थानच्या जनतेला संबोधित करतील. सोमवारी दिल्लीत केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक मोदींच्या निवासस्थानी पार पाडली. कलम 370 रद्द झाल्यानंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून काय बोलतात याची देशवासीयांमध्ये उत्सुकता आहे.

कश्मीरमध्ये लाल चौकात गृहमंत्री अमित शाह तिरंगा फडकवणार

नुकतंच केंद्र सरकारने जम्मू कश्मीरसंदर्भातील कलम 370 आणि 35 ए हटवले आहे. त्या पार्श्वभूमीवर कश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. कलम 370 हटल्याने पाकिस्तानाचा तीळपापड झाला आहे. गेली अनेक दिवस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत. डोवाल कश्मिरी जनतेत मिसळून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह कश्मीरभेटीवर येणार असून लाल चौकात ते तिरंगा फडकावतील असे वृत्त आहे. पोलिसांनी अजून या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

लाँग वीकेंडची सुरूवात

15 ऑगस्ट गुरूवारी येत आहे. अनेकांनी गुरूवार ते रविवार अशा चार दिवसांचा वीकेंड प्लान तयार केला आहे. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे अजून सुरू झालेली नाही. म्हणून रस्तेमार्गे पर्यटक लोणावळा खंडाळा गाठू शकतात. त्यामुळे यामुळे मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

रक्षाबंधनचा उत्त्साह

बहीण आणि भाऊ यांचा पवित्र सण रक्षाबंधनसुद्धा गुरूवारी येत आहे. त्यामुळे बाजारात त्याची लगबग सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राख्यांनी बाजार सजले आहे.

सेक्रेड गेम्स 2 ची उत्सुकता

बहुप्रतिक्षित सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सवरील वेबसीरीजचा दुसरा भाग येत आहे. गेली दीड वर्षे प्रेक्षक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. गणेश गायतोंडे मेला नाहीये, मुंबईवर नेमके कुठले संकट आहे, त्रिवेदीचे काय होणार आहे, तसेच हा शेवटचा सीजन असणार की तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे गुरुवारी मिळणार आहेत.

बाटला हाऊस, मिशन मंगल प्रदर्शित होणार

अक्षय कुमार याची मध्यवर्ती भुमिका असलेला मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाऊस हे सत्यघटनेवर आधारित असलेले चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. त्यापैकी बाटला हाऊस हा प्रदर्शनापूर्वी वादात अडकला होता. बाटला हाऊस हा चित्रपट दिल्लीत झालेल्या बाटला एनकाऊंटवर आधारित आहे. तर अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट हिंदुस्थानच्या मंगळ मोहिमेवर आधारित आहेत. प्रेक्षक आता कुठल्या चित्रपटाला जास्त पसंती देतील हे उद्या स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या