कश्मीरात तिरंगा डौलाने फडकणार; सीमेवर हाय अलर्ट

732

देशभरात प्रतिवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून कश्मीर खोऱयातही तिरंगा डौलाने फडकणार आहे. 370 कलम हटविल्यानंतर लावण्यात आलेले निर्बंध जम्मू विभागातून पूर्णपणे मागे घेण्यात आले आहेत, तर कश्मीरात शिथिल केले आहेत. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान, खबरदारीचे उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ केली आहे. पाकडय़ांच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे.

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-कश्मीरात 5 ऑगस्टपासून प्रशासनाने निर्बंध घातले होते. आज जम्मू विभागातील निर्बंध पूर्णपणे हटविले आहेत. तर काश्मीर खोऱयात शिथिल केले आहेत. काही भागात हे निर्बंध सुरू ठेवल्याची माहिती जम्मू-कश्मीरचे अतिरिक्त पोलीस संचालक मुनीर खान यांनी दिली.

काही समाजकंटकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. स्वातंत्र्यदिन शांततेत साजरा व्हावा यासाठी उपाययोजना केल्याचे मुनीर खान म्हणाले.

– श्रीनगरसह अनेक भागात शांतता आहे. प्रशासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी अनुचित घटना टाळण्यासाठी जनतेने लोकांना सहकार्य करावे. लोकांनी लायटर, सिगारेट, काडेपेटी, धारदार वस्तू, स्टॉप वॉच, पावडर आदी वस्तू जवळ बाळगू नये. लष्करी जवान आणि पोलिसांकडून विचारणा झाल्यास ओळखपत्र दाखवावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.

शाह, फैसल यांना विमानतळावरच रोखले; कश्मीरात रवानगी
370 हटविल्यापासून सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणारे माजी सनदी अधिकारी आणि पीपल्य मूव्हमेंट पार्टीचे अध्यक्ष शाह फैसल यांना आज सकाळी दिल्ली विमानतळावर रोखले. फैसल हे इस्तंबूलकडे रवाना होणार होते. पब्लिक सेफ्टी ऍक्ट (पीएसए) अंतर्गत फैसल यांच्यावर कारवाई करून त्यांची रवानगी काश्मीरात केली असून त्यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे. शाह यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर सरकारची नजर होती. त्यातच ते तुर्कीकडे रवाना होणार होते. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीच कश्मीर खोऱयातील काही फुटीरतावाद्यांना आग्रा तुरुंगात हालविले आहे.
370 कलम हटविल्यानंतर कश्मीर खोऱयात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र हा तणाव हळूहळू कमी होत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. 370 कलम हटविल्यानंतर साजरा होणारा स्वातंत्र्य दिन शांततेत आणि उत्साहात होईल, असा विश्वास जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसाल यांनी व्यक्त केला.

– श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तिरंगा फडकविणार असे वृत्त आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कश्मीर दौऱयाची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

– श्रीनगरसह संपूर्ण कश्मीर खोऱयात राष्ट्रध्वज तिरंगा डौलाने फडकणार आहे. सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे.

– स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा श्रीनगर येथील शेर-ए-कश्मीर स्टेडियम येथे होईल. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या