हिंदुस्थान-अमेरिकेमध्ये 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

427

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थानभेटीत उभय देशांत व्यापार करार झाला नाही; पण हिंदुस्थानला 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25 हजार कोटी रुपये) किमतीची लष्करी शस्त्रास्त्रे आणि उपकरणे पुरविण्याच्या करारावर मात्र अमेरिकेने मंगळवारी मोहोर उठवली. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त बैठकीत संरक्षण करारावर उभय देशांनी शिक्कामोर्तब केले. दरम्यान, आपला 36 तासांचा हिंदुस्थान दौरा आटोपून मंगळवारी रात्री 10च्या सुमारास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला रवाना झाले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. करारानुसार अमेरिका 24 एमएच-60 रोमिओ हेलिकॉप्टर्स आणि 6 अपाचे हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हायटेक तंत्रज्ञानही पुरवण्याचे आश्वासन अमेरिकेने नव्या कराराद्वारे दिले आहे.

व्यापार कराराबाबत अमेरिकेचे ‘आहिस्ते कदम’

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज हिंदुस्थानशी होणाऱ्या संभाव्य व्यापार कराराची निश्चिती मात्र केली नाही. चीनसोबतच्या व्यापारयुद्धामुळे अमेरिकन मालाला आशिया खंडात मोठी बाजारपेठ हवीच आहे. त्यामुळे हिंदुस्थानशी व्यापार करार करण्यापूर्वी अमेरिका आपल्या लाभाच्या क्षेत्रांचा अभ्यास करीत आहे. व्यापार करारात हिंदुस्थानला काही अटी-शर्ती घालून त्याला अंतिम स्वरूप देण्याचे ट्रम्प प्रशासनाचे धोरण आहे. त्यामुळे आज इंडो-अमेरिका व्यापार करारावर निश्चिती झाली नाही. केवळ भविष्यातील आश्वासनांवर अमेरिकेने वेळ मारून नेली.

इव्हांकाची शेरवानी बनवली मराठमोळ्या अनिता डोंगरेंनी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि कन्या इव्हांका ट्रम्प यांनी हिंदुस्थान भेटीत आपल्या पोशाखांनाही हिंदुस्थानी टच दिला आहे. इव्हांकाने मंगळवारी रेशमी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी मराठमोळय़ा फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाइन केली आहे. शेरवानीची किंमत 82,400 रुपये आहे. ‘सुरूही शेरवानी’ असे या शेरवानीचे नाव असून तिची शिलाई पश्चिम बंगालमधील कारागीरांनी हाताने केली आहे, असे अनिता डोंगरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या